ऑनलाईन टीम / बीजिंग :
चीनच्या पहिल्या मंगळ मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. चीनने हैनान प्रांतातील वेनचँग अवकाश केंद्रावरून आज ‘तिआनवेन-1’ या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. चायना एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन’ने यासंदर्भात माहिती दिली.
मंगळावरील हवामान, माती, पाणी, पर्यावरण आणि भूरचना यांचा अभ्यास करण्यासाठी चीनने हा उपग्रह अवकाशात सोडला आहे. हा उपग्रह सात महिने प्रवास करून मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल. मंगळाच्या कक्षेत पोहोचल्यानंतर त्याचे ऑर्बिटर, लँडर आणि बग्गी हे तिन्ही भाग वेगळे होतील. ऑर्बिटर इतर अभ्यासासाठी कक्षेतच राहणार असून लँडर मंगळभूमीवर उतरणार आहे. त्यातून सहा चाकांची आणि चौर सौर पॅनेल असलेली बग्गी बाहेर येऊन जमिनीचे निरीक्षण करेल.
मंगळावर बग्गी तीन महिने अभ्यास करणार आहे. मंगळावर उतरून त्याच्या चारही बाजूंचे निरीक्षण करणे, त्याची छायाचित्रे काढणे, त्याचा नकाशा तयार करणे, पाणी आणि सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचे काम हा उपग्रह करेल.









