वृत्तसंस्था / बीजिंग :
चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढतच चालला आहे. अमेरिकेने 16 जूनपासून चीनच्या सर्व विमानोड्डाणांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल चीनने अमेरिकेच्या एअरलाइन्सला स्वतःच्या देशात मर्यादित उड्डाणांची अनुमती देणार असल्याचे सांगितले आहे.
चीनमध्ये कोरोना संसर्गामुळे आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आता विदेशी एअरलाईन्सना मर्यादित उड्डाणांची अनुमती दिली जाणार आहे. याचबरोबर अमेरिकेच्या एअरलाईन्सवरील बंदी हटविली जाणार असल्याचे समजते.
जानेवारीमध्ये दोन्ही देशांमधील विमानोड्डाणे कमी झाली होती. अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स या कंपन्या दोन्ही देशांदरम्यान काही प्रमाणात विमानसेवा संचालित करत होत्या. चीनच्या एअरलाइन्सनेही स्वतःची काही उड्डाणे बंद केली आहेत.
युनायटेड एअरलाइन्स आणि डेल्टा एअरलाइन्स 1 जूनपासून चीनसाठी विमानसेवा सुरू करू पाहत होत्या. परंतु या कंपन्यांच्या विनंतीनंतरही चीनने मंजुरी दिली नव्हती. कोरोना संसर्गामुळे उड्डाणांवर बंदी घालण्यात आल्याचे चीनकडून सांगण्यात आले होते.
विमानोड्डाणासंबंधी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या कराराचे चीन उल्लंघन करत आहे. दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध कायम रहावेत, याकरता चीनच्या अधिकाऱयांशी चर्चा करणार असल्याचे युएस ट्रान्सपोर्टेशन डिपार्टमेंटने म्हटले आहे.









