कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली करवाढ -नागरिकांमध्ये संतापाची लाट
प्रतिनिधी/ चिपळूण
गेल्या पावणेदोन वर्षापासून कोरोना लॉकडाऊनमुळे मेटाकुटीला आलेल्या शहरातील नागरिकांवर गेल्या महिन्यात महापुराचे मोठे संकट कोसळले. यातून शहरातील नागरिक अद्याप सावरलेले नसतानाच आता नगर परिषदेने कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली मोठी करवाढ लागू करण्याची नोटीस शनिवारी जाहीर केली आहे. यामुळे काहीजणांना मुळ कराच्या रक्कमेत दुप्पट वाढ होणार असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना जगण्यासाठी सामना करावा लागत असतानाच जुलै महिन्यातील महापुरामुळे बहुतांशी शहर उद्ध्वस्त झाले. त्यातून चिपळूणकर सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच नगर परिषदेने शनिवारी कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली चालू आर्थिक वर्षात करवाढीची नोटीस जाहीर केली आहे. या करवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकाला वर्षाला 480 रूपये वाढीव कर भरावा लागणार आहे. यापूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या सभेतच करवाढीबाबतचा ठराव झालेला असल्याने त्या ठरावाची अंमलबजावणी करण्याचे नगर परिषद प्रशासनाने ठरवले आहे.
या करवाढीमुळे व्यावसायिक, शोरूम, गोदाम, हॉटेल, लॉजिंग, रूग्णालये, शौक्षणिक, धार्मिक संस्था यांना वर्षाला मुळ कराच्या जवळपास दुप्पट कर भरावा लागणार आहे. कोरोनामुळे नगर परिषदेने करामध्ये माफ अथवा त्यामध्ये सूट द्यावी, अशी मागणी पुढे येत असतानाच आता त्यामध्ये कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली अधिक वाढ केल्याने नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त होत आहे.