प्रतिनिधी / चिपळूण
कामथे उपजिल्हा रूग्णालयासह शहरातील बहुतांशी खासगी रूग्णालये ही कोविड केअर सेंटर झाल्याने सर्प, विंचूदंश झालेल्या रूग्णांना वैद्यकीय उपचार मिळेनासे झाले आहेत. गेल्या आठवड्यात धामणवणे आणि कापसाळ येथील दोन लहान मुलांना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विंचूदंश झाल्याने उपचारासाठी कामथेसह चार रूग्णालये पालथी घातल्यानतंर एका रूग्णालयात उपचार मिळाले. सध्या भातकापणीचा हंगाम सुरू झाल्याने विंचू, संर्पदंश झाल्यास रूग्णांनी जायचे कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्या मार्च महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. बहुतांशी खासगी रूग्णालयांमध्ये कोरोना रूग्णच तपासून उपचार केले जात आहेत. अन्य रूग्णांना त्यांची जुनीच औषधे घेण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचाराबाबत असंख्य अडचणी निर्माण झालेल्या असतानाच आता पावसाचा जोर कमी झाला असून कडाक्याचे ऊन आणि मध्येच पाऊस कोसळत आहे. अशातच भातकापणीचाही हंगाम सुरू होऊ लागला आहे. दरवर्षी या हंगामात सर्प आणि विंचूदंशाचे रूग्ण शेकड्यात सापडतात. या रूग्णांवर कामथे उपजिल्हा रूग्णालयात उपचार करून घरी पाठवले जाते.
यावर्षीही गेल्या आठवड्यापासून संर्प आणि विंचूदंशाचे रूग्ण सापडू लागले आहेत. कोरोनामुळे शहरात उपचारासाठी व्यवस्था नसल्याचे पाहून काही गावातच गावठी उपचार केले जात आहेत. धामणवणे, कापसाळ येथील दोन लहान मुलांना सायंकाळच्या वेळेत विंचूदंश झाल्यानंतर त्यांनी कामथेत चौकशी केली तर त्यांना रावतळेतील वालावलकर रूग्णालयाच्या सेंटरवर पाठवण्यात आले. तेथे गेल्यानंतर आमच्या सेंटरची वेळ 5 वाजताची असल्याने ते आता बंद झाले असल्याचे सांगण्यात आले. पुढे आणखी तीन खासगी रूग्णालयांत नेल्यानंतर येथे कोविड रूग्णांवर उपचार केले जात असल्याचे सांगत अन्यठिकाणी हलवावे असे सांगण्यात आले. त्यानंतर अन्य एका खासगी रूग्णालयात नेऊन दाखल केले. मात्र तेथे दाखल केल्यानंतर तीन दिवसांचे हजारो रूपये बिल झाले.
संर्प, विंचूदंशावरील लस कामथेत पडून
मुळातच सर्प, विंचूदंशावरील लस कामथे रूग्णालयात आहे. मात्र सध्या ते कोविड रूग्णालय असल्याने ही लस त्यांच्याकडेच पडून आहे. त्यांच्या व्यतिरिक्त ते बाहेर कुणालाही लस देत नाहीत. कामथेची ओपीडी रावतळेतील वालावलकर रूग्णालयाच्या सेंटरमध्ये चालवली जाते. मात्र तेथे सायंकाळी 5 वाजेपर्यंतच उपचार होत असल्याने त्यापुढे दंश झाला तर त्या रूग्णांनी जायचे कोठे, असा सवाल उपस्थित केला जाऊ लागला आहे.
प्रशासनाने मार्ग काढावा
गेल्या आठवड्यात विंचूदंश झालेल्या दोन लहान मुलांना घेऊन उपचारासाठी भटकंती करावी लागली. हे लक्षात घेऊन कामथे उपजिल्हा रूग्णालयाची ओपीडी ही रावतळे येथे सुरू आहे. एक तर तेथे रूग्ण तपासणे अथवा दाखल करून उपचार करणे सुरू करावे, नाहीतर कामथेत आता रूग्णसंख्याही कमी असल्याने अन्य एका इमारतीत या रूग्णावर उपचार करावेत. सध्या भातकापणीच्या हंगामात रूग्णसंख्या वाढीची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने त्यादृष्टीने मार्ग काढणे गरजेचे आहे. – विश्वास वाजे{ सरपंच, धामणवणे ग्रामपंचायत }
Previous Articleचिपळुणात विवाहितेसह दोघांची आत्महत्या
Next Article वैराग शहरासह परिसरात विजेच्या गडगडांसह मुसळधार पाऊस









