अनेकांचा हृदयविकाराने मृत्यू, व्यापाऱयांसह कामगारांमध्ये भीतीचे वातावरण
प्रतिनिधी/ चिपळूण
प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱयांपाठोपाठ आता व्यापाऱयांनाही कोरोनाची बाधा होत आहे, तर काही व्यापाऱयांचा हृदयविकाराने मृत्यू होत आहे. त्यामुळे व्यापाऱयांसह कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन दिवसांत 25 रूग्ण वाढले असून तालुक्याचा आकडा 1089वर गेला आहे.
गेल्या 2 महिन्यांपासून तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. प्रशासनातील मुख्य कोरोना योध्दय़ांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण असतानाच आता काही व्यापाऱयांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर पुणेसह अन्य ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच गेल्या 15 दिवसात अनेक व्यापाऱयांचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. एकीकडे मध्यंतरी गणेशोत्सवामुळे तर सध्या बाजारपेठेत सुरू असलेल्या विविध प्रकारच्या सेलमुळे गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे व्यापाऱयांसह कामगारवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या 2 दिवसात 25 रूग्णांची नव्याने भर पडल्याने तालुक्याचा आकडा 1089वर गेला आहे. यात शहरातील 518, ग्रामीण भागातील 571 रूग्णांचा समावेश आहे. 291 जणांवर कामथे, पेढांबेसह विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे तालुक्यातील 33 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 765 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते 70.25 टक्के आहे.









