चिपळूण:
चिपळुणात गुरूवारी 5 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. यात शहरातील मार्कंडी, बहादूरशेखनाक्यासह खेर्डी व कापरे येथील रूग्णांचा समावेश आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू करण्यात आला असून त्यांच्यासह नातेवाईकांचे 3 जुलै रोजी नमुने घेतले जाणार आहेत.
गुरूवारी कापरे येथील एकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तो मुंबईतून आला आहे. तसेच खेर्डी-भुरणवाडी येथील एकाला कोरोना झाला असून तो संपर्कातून झाल्याचे पुढे आले आहेत. तसेच खेड तालुक्यातील लोटे येथील एका बडय़ा कंपनीत या रोगाने शिरकाव केला आहे. या कंपनीतील मार्कंडी, बहादूरशेखनाका, खेर्डी-वरचीपेठ येथील प्रत्येकी एका कर्मचाऱयालाही बाधा झाली आहे. त्यामुळे येथे एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती मिळताच प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदींनी सर्वाच्या इमारती, घरांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच आवश्यक भाग आयसोलेट करण्यात आले असून नगर परिषदेकडून फवारणी सुरू करण्यात आली आहे.
पाच नव्या रूग्णांमुळे तालुक्याचा आकडा 111वर पोहचला आहे. त्यातील सहाजणांचा मृत्यू झाला असून 79जण बरे झाले आहेत. सध्या 38 कोरोनाबाधितांवर पेढांबे येथील कोविड सेंटरमध्ये, तर काही रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पेंढाबे येथे 6जण देखरेखीखाली असून 35 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. कंपनीतील कर्मचाऱयांच्या सपर्कातील व्यक्तींचा शोध घेणे प्रशासनासाठी आव्हान बनले असून त्यांना सोडण्या-आणण्यासाठी असलेल्या बसेसमध्ये किती कर्मचारी असतात याच्या आकडय़ासह त्यांची साधी यादीही नसल्याने प्रशासन बुचकळय़ात पडले आहे. त्यामुळे यातून मोठा संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या रूग्ण सापडलेल्या भागात आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.









