प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळुणात मंगळवारी सायंकाळी 6 नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. हे सर्वजण पहिल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे तालुक्याचा आकडा 106वर पोहचला आहे.
मंगळवारी कापसाळ-पायरवाडी व गोवळकोट येथील प्रत्येकी तीन नव्या रूग्णांची भर पडली. यातील कापसाळ येथील रूग्ण पूर्वीच्या बाधिताच्या, तर गोवळकोट येथील रूग्ण फार्मासिस्ट, शिक्षिका व मेडिकलमधील कर्मचारी तरूणी यांच्या संपर्कातील आहेत. या सहाजणांमुळे तालुक्याचा आकडा 106वर पोहचला आहे. त्यातील सहाजणांचा मृत्यू झाला असून 74जण बरे झाले आहेत. सध्या 21 कोरोनाबाधितांवर पेढांबे येथील कोविड सेंटरमध्ये, तर काही रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पेंढाबे येथे 6जण देखरेखीखाली आहेत.
ज्या-ज्या गावांमध्ये रूग्ण सापडले आहेत, त्या गावांमध्ये प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदी प्रयत्न करीत आहेत. आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर शहरात मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली रूग्ण सापडलेल्या ठिकाणी दरदिवशी फवारणी केली जात आहे.









