प्रतिनिधी/ चिपळूण
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हय़ात शहरीसह ग्रामीण भागातही 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सीन लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. यामध्ये बुधवारी तालुक्यातील फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणावेळी एका 15 वर्षीय विद्यार्थ्याला लसीचे चक्क 2 डोस दिल्याचे समोर आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान विद्यार्थ्याला सायंकाळी निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी कामथे येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शासनाने मुलांसाठी कोव्हॅक्सीन लस आणली आहे. सोमवारी या लसीकरण मोहिमेचा सर्वत्र उत्स्पूर्तपणे शुभारंभ करण्यात आला. शुभारंभावेळी तालुक्यातील 195 मुलांना हा डोस देण्यात आला. आठवडय़ातून बुधवार व शनिवार या दोन दिवशी या वयोगटातील मुलांना डोस दिले जाणार आहेत. सध्या 18 वर्षावरील सर्वांना पहिला डोस घेतल्यानंतर कोविशिल्ड 84 दिवसांनी तर कोव्हॅक्सीन 28 दिवसांनी दिली जात आहे. हे लसीकरण शहरासह रामपूर, कापरे, खरवते, दादर, शिरगाव, अडरे, सावर्डे, फुरूस, वहाळ या नऊही प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रूग्णालयातून केले जात आहे.
दरम्यान, बुधवारी फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणावेळी नववी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थ्याला एकाचवेळी 2 डोस दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. पहिला लसीचा डोस घेतला गेल्यानंतर तो बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसला. त्यानंतर पुन्हा त्याला आत बोलावून दुसरा डोस दिला गेल्याचे सांगण्यात आले. सकाळी 10.30 वा. हा प्रकार घडल्यानंतर तूर्तास या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास सध्यातरी झालेला नाही. मात्र विद्यार्थ्याच्या पालकाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव यांना संपर्क करून या बाबतची माहिती दिली. त्रास नसला तरी खबरदारी म्हणून या विद्यार्थ्याला कामथे उपजिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली आणण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या.
लसीचा डोस देताना प्रथम नोंदणी करून नंतर टोकन दिले जाते. तरीही दोन डोस कसे देण्यात आले, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तैनात असतानाही चुकीचा प्रकार नेमका कसा घडला. वास्तविक शिक्षकांनीही तेथे उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे आता आरोग्य विभाग कसे पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेथील आरोग्य कर्मचारी, डॉक्टर मात्र असा प्रकार घडलाच नाही, असे सांगत आहेत. मात्र विद्यार्थ्याच्या हाताचा दंडावर दोन इंजेक्शन टोचल्याच्या खुणाही स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहे.









