राज्य उत्पादन शुल्क’च्या मुंबईतील भरारी पथकाची कुंभार्ली घाटात कारवाई
चिपळूण
विनापरवाना सुमारे 1 कोटी रूपये किंमतीची गोवा बनावटीची दारु मुंबईतील उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पकडली आहे. ही कारवाई मंगळवारी मध्यरात्री कुंभार्ली घाटात करण्यात आली. एका ट्रकमधून ही वाहतूक होत होती. तर संशयित आरोपींचा प्रवास 2 कारमधून सुरू होता. त्यामुळे या प्रकरणी सातजणांना अटक करण्यात आली असून त्यातील चौघे सावंतवाडीतील आहेत. या कारवाईत 1 कोटी 23 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केदारसिंग धनसिंग (26, सध्या-हेदलपूर-मालवणी, मुळ-राज्यस्थान), पवनकुमार राजेश पटेल (29, मिर्झापूर-इंदोर मध्यप्रदेश), प्रदीप अर्जून पाटील (47, माटेगाव-सावंतवाडी), प्रकाश अर्जून पाटील (47, माटेवाडी-सावंतवाडी), अजय सूर्यकांत कवठणकर (23, ओटवणे-सावंतवाडी), रोहित दत्ता साळगावकर (25, कोणगाव-सावंतवाडी), मंदार दत्ता साळगावकर (29, कोणगाव-सावंतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमात शिथिलता आल्याने सध्या घाटमाथा ते कोकण अशी वाहतूक सुरु झाली आहे. असे असतानाच या संधीचा फायदा घेत विनापरवाना गोवा बनावटीची दारु वाहतूक करणारा ट्रक तालुक्यातील कुंभार्ली घाटात येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला. मंगळवारी रात्री 1 च्या सुमारास कुंभार्ली घाटात आलेला ट्रक थांबवून त्यावरील चालक केदारसिंग याची या पथकाने चौकशी केली असता त्यामधून गोवा बनावटी दारु वाहतूक करीत असल्याचे पुढे आले. त्यामुळे हा ट्रक खेर्डी एमआयडीसीत आणून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये 180 मिली क्षमतेच्या 48 सिलबंद बाटल्यांनी भरलेले 1 हजार 350 बॉक्स इतका दारुसाठा आढळला. या दारु वाहतुकीशी संबंधित असलेल्या आणखी 2 चारचाकी गाडय़ा जप्त करण्यात आल्या आहेत. दारुसाठा तसेच वाहने असा एकूण 1 कोटी 23 लाख 3 हजार 70 रुपये इतका मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई निरीक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, संजय राठोड, सुरेश पाटील, शंकर जाधव, विशाल सकपाळ तसेच सर्वश्री वसावे, राजेंद्र भालेकर, एस. एन. वड, ए. एन. शेख धनाजी दळवी, बाळकृष्ण दळवी, रवींद्र पाटील, सोमनाथ पाटील, अमोल चिलगर, सुधीर देसाई आदींच्या पथकाने केली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, शिरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन कारवाई करण्यासाठी भरारी पथकाला मदत केली.









