तिवरे-गंगेचीवाडी येथील घटना, दोघांवर गुन्हा
चिपळूण
काही दिवसांपूर्वी सख्ख्या भावाने चाकू हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच माडी प्यायलेल्या दोघांनी वाडीतील लोकांना शिविगाळ करुन एकावर थेट चाकू पोटात खुपसून जखमी केल्याची घटना तिवरे-गंगेचीवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात एकजण जखमी झाला असून हल्लेखोरावर अलोरे-शिरगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश दाजी पवार, रोहित अनिल निकम (तिवरे-गंगेचावाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत, तर याबाबतची फिर्याद अल्पेश अंकुश पवार (25, तिवरे-गंगेचीवाडी) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पेश पवार तसेच नागशे पवार, रोहित निकम हे तिघेही तिवरे-गंगेचीवाडी येथील राहणारे आहेत. 14 एप्रिल रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास तिवरे-गंगेचावाडी याठिकाणी नागेश पवार व रोहित निकम हे दोघेजण माडी पिऊन आले व त्यांना वाडीतील लोकांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी मंगेश कृष्णा पवार हा या दोघांना समजावण्यासाठी गेला असता या दोघांनी त्यांनाही शिविगाळ करुन भांडण काढले. त्यावेळी अल्पेश पवार याचे वडील अंकुश पवार हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्या दोघांनी त्यांच्या कानफटात मारली. तेव्हा अल्पेश पवार हाही भांडणे सोडवण्यास गेला असता नागेश पवार व रोहित निकम या दोघांनी त्यालाही शिविगाळ करुन हाताने मारहाण करुन अल्पेश याच्या पोटात चाकू खुपसला. या हल्ल्यात अल्पेश हा जखमी झाला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दाभोळकर करीत आहेत.









