दळवटणे येथील घटना : 16 बैलांची होत होती वाहतूक : स्थानिकासह सांगलीच्या तिघांना अटक : पोलीस कोठडीत रवानगी
चिपळूण :
सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच या संधीचा फायदा घेत तब्बल 16 बैल कत्तलीच्या इराद्याने घेऊन जाणाऱया कंटेनरला चिपळूण पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दळवटणे येथे घडली. या प्रकरणी एका स्थानिकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
अलिमिया चौघुले (खेर्डी), अतुल अरुण पवार (23, पेठनाका-सांगलीफाटा), दुर्गेश शंकर जाधव (19, इस्लामपूर पेठनाका-सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या बाबतची फिर्याद पोलीस नाईक आशिष अशोक भालेकर यांनी दिली.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दळवटणे परिसरातून गुरे वाहतूक केली जाणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समेद बेग यांनी एक पथक तयार केले. बुधवारी मध्यरात्री 3 च्या सुमारास हे पथक दळवटणेकडे रवाना झाले. याचवेळी गावातून कंटेनर येताना त्यांना दिसला. त्यास दळवटणे पुलाजवळ थांबवून पोलिसांनी चालकाकडे प्राथमिक चौकशी केली. यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्याला कंटेनरचा मागील दरवाजा उघडण्यास सांगितले असता त्यात दाटीवाटीने 16 बैल भरले असल्याचे दिसून आले.
पोलिसांनी अतुल व दुर्गेश या दोघांची अधिक चौकशी केली असता त्यांनी अलिमियाँ हा हे बैल वाहतूक करीत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. या तिघांची कसून चौकशी केली असता हे बैल कत्तलीच्या इराद्याने नेत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. कंटेनरसहित या 16 बैलांची किंमत 6 लाख 62 हजार इतकी आहे. हा कंटेनर पोलिसांनी जप्त केला असून बैल खेड तालुक्यातील लोटे येथील गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. ही कारवाई करणाऱया पथकामध्ये सहाय्यक पोलीस फौजदार नामदेव जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आशिष भालेकर, पंकज पडेलकर यांचाही समावेश होता. अटक केलेल्या तिघांना न्यायालयात हजर केले असता 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. इतके बैल नेमके आले कुठून, याचा पोलीस शोध घेत आहेत.









