विशेष विमानाने बीजिंगमध्ये पोहोचले गुप्तहेर
वृत्तसंस्था / काबूल, बीजिंग
अफगाणिस्तान सरकारने चीनच्या 10 हेरांना गुपचूप माफी दिली असून त्यांना विशेष विमानाने चीनमध्ये हलविण्यात आले आहे. या चिनी हेरांना काबूलमध्ये दहशतवादी गट चालविण्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सर्व हेर चीनच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असून यात महिलेचाही समावेश आहे.
25 डिसेंबर रोजी या चिनी हेरजाळय़ाचा खुलासा झाला होता. अफगाणिस्तानची सुरक्षा सेवा एनडीएसने त्यांना ताब्यात घेतले होते. हेरगिरीसाठी माफी मागितल्यास या हेरांना माफी प्रदान करण्याचा प्रस्ताव अफगाणिस्तानने चीनसमोर मांडला होता. अफगाणिस्तानने कुठल्या अटींवर चिनी हेरांची मुक्तता केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
23 दिवसांपर्यंत ताब्यात
अध्यक्ष अशरफ गनी यांच्याकडून मंजुरी मिळाल्यावर 10 चिनी हेरांना मायदेशी परतण्याची अनुमती देण्यात आली होती. हे हेर 23 दिवसांपर्यंत सुरक्षा दलांच्या ताब्यात होते. माफी अंतर्गत चीनने आंतरराष्ट्रीय मापदंडांचे उल्लंघन करत अफगाणचा विश्वासघात केल्याचे मान्य करणे अपेक्षित होते. हेरांना ताब्यात घेतल्याची घोषणा करू नये असा आग्रह चिनी राजदूताने अफगाणिस्तानकडे धरला होता.









