7 दिवसांत दोनवेळा भिडले दोन्ही देशांचे सैन्य : सिक्किमपूर्वी लडाखमध्ये घडला प्रकार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान चालू आठवडय़ात दोन ठिकाणी संघर्ष दिसून आला आहे. शनिवारी उत्तर सिक्कीममध्ये हा संघर्ष झाला असून स्थानिक कमांडर पातळीवर तो शमविण्यात आला आहे. तत्पूर्वी 5 मे रोजी रात्री पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैनिक समोरासमोर उभे ठाकले होते. या संघर्षात दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान संदर्भात भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे चीनने कुरापती सुरू केल्याचे मानले जात आहे.
उत्तर सिक्कीममध्ये संघर्ष झाला असून दोन्ही देशांच्या सैनिकांनी आक्रमक भूमिका दर्शविली. दोन्ही देशांचे सैनिक किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक कमांडर स्तरावर चर्चा करून हा संघर्ष संपुष्टात आणला गेला आहे. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे 19 हजार फुटांच्या उंचीवर नाकु ला खिंडीनजीक शनिवारी दुपारी हा संघर्ष झाल्याचे भारतीय सैन्याकडून सांगण्यात आले आहे.
लडाखमध्येही संघर्ष
पूर्व लडाखमध्ये भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये संघर्ष झाला आहे. सीमेसंदर्भात दोन्ही देशांची भूमिका परस्परविरोधी असल्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अशाप्रकारे अनेकदा खटका उडत असतो. हे प्रकार स्थानिक कमांड पातळीवर चर्चा करून रोखले जात असल्याचे सांगण्यात आले.
10 ठिकाणे संवेदनशील
भारत-चीन सीमा म्हणजेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 10 ठिकाणांवर संघर्ष होण्याची शक्यता असते. सीमेवर वाद होऊ नये याकरता स्थानिक कमांड पातळीवर मुद्दे निकालात काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गिलगिट-बाल्टिस्तानचा संदर्भ
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणूक घेण्याचा निर्णय दिला आहे. परंतु या निर्णयाला भारताने तीव्र विरोध दर्शवत अनेक कठोर पावले उचलली आहेत. परंतु गिलगिट-बाल्टिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधूनच चीनचा सीपाईसी प्रकल्प जातो. या भागात हितसंबंध असल्यानेच भारतविरोधी कारवाया करून ड्रगन भारताला गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असावा.
पाकिस्तानच्या हालचालींवर भारताची बारीक नजर
भारताला प्राप्त झालेल्या अहवालानुसार पाकिस्तानची एफ-16, जेएफö17 आणि मिराज-3 विमाने भारतीय सीमारेषेजवळ उड्डाण करत आहेत. पाकिस्तानच्या या कारवायांना पाहता भारतीय सैन्य पूर्णपणे सतर्क आहे. सीमेवर पाकिस्तानी हवाई दलाच्या प्रत्येक कुरापतीवर नजर ठेवली जात आहे. भारतीय हवाई दलाचे एअरबेसही पूर्ण सतर्क करण्यात आले आहे. पाकिस्तानी विमानांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी भारताकडून ‘अवॅक्स’ची मदत घेतली जात आहे. हंदवाडा येथील मोहिमेदरम्यान भारतीय सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य पुन्हा सर्जिकल स्ट्राईक घडवून आणेल अशी भीती पाकिस्तानला सतावत असल्याचे मानले जात आहे. या भीतीपोटीच पाकिस्तानने सीमेनजीक लढाऊ विमानांचा वावर वाढविला आहे.
सिक्कीम-नाकुला सेक्टरमध्ये भारत-चीन आमने-सामने
भारत-चीन सीमेवरही तणाव सुरू असल्याचे रविवारी स्पष्ट झाले. सिक्कीममधील नाकुला सेक्टरमध्ये चीन आणि भारताचे सैनिक भिडले असून त्यात दोन्ही देशांचे जवान जखमी झाल्याचे सांगण्यात आले. शनिवारी उशिरा हा प्रकार घडल्यानंतर या भागातील सुरक्षा दलांनाही अतिदक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका अधिकाऱयाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांचे जवळपास दीडशे सैनिक या संघर्षात सहभागी झाले होते. चीनच्या आक्रमक पवित्र्यानंतर भारतानेही कठोर भूमिका घेतल्यामुळे तणाव चिघळला होता. मात्र, अखेरीस चर्चेच्या माध्यमातून या स्थितीवर तोडगा काढण्यात आला.









