तिन्ही हल्लेखोरांना ठार करण्यात यश
@ काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये चायनीज हॉटेल म्हणून ओळखल्या जाणाऱया रेस्टॉरंट आणि गेस्ट हाऊसवर सोमवारी सशस्त्र बंदुकधाऱयांनी हल्ला केला. या हल्ल्यावेळी हॉटेलमध्ये अनेक चिनी नागरिक उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. हा हल्ला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला. त्यानंतर तातडीने पावले उचलत तिन्ही हल्लेखोरांना ठार करण्यात आले. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात दोन विदेशी नागरिक जखमी झाल्याचे तालिबानकडून सांगण्यात आले.
रेस्टॉरंटमधील हल्ल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यामध्ये इमारतीच्या एका भागात आग लागल्याचे दिसत आहे. तसेच हॉटेलमधून गोळीबाराचा आवाज येत असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तालिबान सरकार किंवा चीनच्या दुतावासाने याप्रकरणी सतर्कता बाळगत एकंदर घटनेवर नजर ठेवली आहे.
दोन आठवडय़ांपूर्वी याच भागात पाकिस्तानच्या दुतावासावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एक पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी जखमी झाला होता. आता या नव्या हल्ल्याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. चीनच्या राजदुताने शुक्रवारी तालिबान अधिकाऱयांशी काबूलमधील आपल्या दुतावासाच्या सुरक्षेबाबत चर्चा केली होती. त्यानंतर दोन-चार दिवसातच हा हल्ला झाला आहे.









