देशात 6 वर्षांत 40 टक्क्यांनी घटले विवाह , घरगुती हिंसाचार अन् कामाचा ताण कारणीभूत
चीनमध्ये 25 ते 40 वर्षांच्या वयोगटातील लोक म्हणजे मिलेनियल्स (ज्यांचा जन्म 1981 ते 1996 दरम्यान झाला आहे) चांगल्या रोजगारात व्यस्त असून चांगली कमाईही करत आहेत. परंतु विवाह करणे टाळत आहेत, विवाहासंबंधी त्यांचा मोहभंग होत असल्याने ही टाळाटाळ सुरू असून यामुळे चीन सरकार त्रस्त झाले आहे.
तज्ञांनुसार या समस्येचे सर्वात मोठे कारण चीनमध्ये दशकांपासून सुरू असलेले लोकसंख्या नियंत्रण धोरण आहे. याचबरोबर घरगुती हिंसाचार, कामाचा ताण ही मोठी कारणे आहेत. चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात 6 वर्षांदरम्यान मिलेनियल्सच्या विवाहांचा दर 41 टक्क्यांपर्यंत खालावला आहे.
युवतींमध्ये विवाहाची अनिच्छा
या वयोगटात पहिल्यांदा विवाह करणारे लोक 2013 साली 2.38 कोटी होते. तर 2019 मध्ये हा आकडा कमी होत 1.39 कोटी राहिला आहे. लोकसंख्या नियंत्रण धोरणामुळे तरुणाई विवाह टाळत आहे. युवकांसह युवतींमध्येही विवाहाची अनिच्छा वाढली आहे. विविध संस्थांमध्ये कार्यरत युवती स्वतःची भूमिका कायम ठेवणे किंवा ती उत्तम करू इच्छित आहेत.
सरकारकडून उपाययोजना
चीनच्या नागरी मंत्रालयाचे अधिकारी यांग जोंगताओ यांच्यानुसार विवाह आणि संतती प्राप्ती दोन्ही गोष्टी परस्परांशी संबंधित आहेत. विवाहाबाबत मोहभंग झाल्यावर जन्मदर प्रभावित होते स्वाभाविक आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजनांवर काम करत आहे.
एक मूल धोरण बंद
चीनच्या नागरी मंत्रालयानुसार 2019 मध्ये 1000 जणांपैकी सरासरी 6.6 लोकांनीच विवाह केला आहे. ही संख्या 14 वर्षांमध्ये नीचांकी ठरली आहे. या घसरत्या आकडय़ासाठी 1979 मध्ये लागू करण्यात आलेले ‘एक मूल धोरण’ सर्वात मोठे कारण आहे. या धोरणामुळे 2014 मध्ये कार्यबळात पहिल्यांदाच आकुंचन होताना दिसून आला आहे. हे धोरण आता बंद करण्यात आले असून चीनमध्ये आता दोन अपत्यांना जन्म देण्याची सूट आहे.









