3 एप्रिलनंतर पहिल्यांदाच आढळला रुग्ण : जगभरात 41 लाख 18 हजार 350 बाधित
जगभरातीत कोरोनाबाधितांची संख्या आता 41 लाखांहून अधिक झालेली आहे. तर 2 लाख 80 हजार 718 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. चीनच्या वुहान शहरात एक महिन्यापेक्षा अधिक कालावधीनंतर रविवारी नवा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान शहरातूनच कोरोना संसर्गास प्रारंभ झाला होता. 76 दिवसांच्या कठोर टाळेबंदीनंतर तेथील स्थिती सुधारली आहे. 8 एप्रिल रोजी शहरात लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले होते. पाकिस्तानात बाधितांची संख्या 28 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. तर बळींचा आकडा 700 हून अधिक झाला आहे. परंतु इम्रान खान सरकारने कथित टाळेबंदी शिथिल केल्याने देशातील डॉक्टरांनी विरोध चालविला आहे.
अमेरिका : 25 हजार नवे रुग्ण

अमेरिकेत दिवसभरात 25 हजार नवे बाधित सापडले आहेत. देशातील एकूण बाधितांची संख्या 13,47,318 वर पोहोचली आहे. तसेच बळींची संख्या 80,040 वर गेली आहे. दिवसभरात 1,615 जणांना जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतील सर्व 50 प्रांतांमध्ये संसर्ग फैलावला आहे. व्हाइट हाउसशी संबंधित 3 मोठय़ा अधिकाऱयांना विलगीकरणात पाठविण्यात आले आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्थितीला सामोरे जाण्यासाठी अवलंबिण्यात आलेल्या रणनीतिप्रकरणी ट्रम्प प्रशासनावर टीका केली आहे.
ब्रिटन : अमेरिका करणार मदत

ब्रिटनच्या आरोग्य विभागाने 50 हजार नमुने चाचणीसाठी अमेरिकेत पाठविले आहेत. ब्रिटनमधील शासकीय प्रयोगशाळांमध्ये काही अडचणी उद्भवल्या होत्या. या अडचणींना तोंड देण्यासाठी योजना सज्ज आहे. योजनेनुसार हे नमुने अमेरिकेत पाठविण्यात आले आहेत. चाचणीच्या गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यात आली नसल्याचे डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड सोशल केयरने सांगितले आहे.
दक्षिण कोरिया : सोल पुन्हा बंद

दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये मागील काही दिवसांपूर्वी टाळेबंदी शिथिल करण्यात आली होती. नाइट क्लब, हॉटेल, बार आणि डिस्को खुले करण्यात आले होते. परंतु तेथे आता संसर्गाचे पुन्हा प्रमाण वाढू लागले आहे. संसर्ग वाढू लागल्याने सरकारने ही सर्व ठिकाणे पुढील आदेशापर्यंत बंद केली आहेत. काही लोकांनी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न केल्याने सर्वांनाच त्रास होत असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले आहे.
चीनमध्ये 14 नवे रुग्ण

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागानुसार दिवसभरात 14 नवे रुग्ण सापडले आहेत. 28 एप्रिलनंतर एका दिवसात सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची ही सर्वात मोठी संख्या आहे. शुक्रवारी 13 नवे रुग्ण सापडले होते. तर शनिवारी सापडलेल्या 14 पैकी 2 रुग्ण हे विदेशातून परतलेले नागरिक आहेत. जुलिन प्रांतात 11 रुग्ण सापडले आहेत. प्रशासन आता या या राज्यावर करडी नजर ठेवून असून तेथे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जर्मनीत टाळेबंदीला विरोध

जर्मनीच्या बर्लिन, म्युनिच आणि प्रँकफर्ट या तीन मोठय़ा शहरांमध्ये सुमारे 10 हजार लोकांनी टाळेबंदीच्या विरोधात निदर्शने केली आहेत. निदर्शनादरम्यान काही लोकांनी पोलिसांना पुष्प देऊन कायदा-सुव्यवस्था राखल्याबद्दल आभार मानले आहेत. सरकारने प्रत्येक महिन्याला टाळेबंदी वाढविण्याऐवजी अन्य पर्याय शोधून लोकांना मोकळा श्वास घेऊ द्यावा. सोशल डिस्टन्सिंग संसर्गापासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय असल्याचे निदर्शकांनी म्हटले आहे.
ब्राझील : समस्या वाढली

ब्राझीलचे सरकार आणि विशेषकरून जायर बोल्सोनारो यांनी कोरोनाचा संसर्ग गांभीर्याने घेतलेला नाही. इशारा देणाऱया स्वतःच्या सहकाऱयालाच बोल्सोनारो यांनी हटविले होते. ब्राझीलमधील बळींचा आकडा 10 हजारांपेक्षा अधिक झाला आहे. तर 1 लाख 56 हजार 61 बाधित आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा वाढून देखील सरकारने कठोर पावले उचलेली नाहीत. शेजारी देश व्हेनेझुएला तसेच अमेझॉनमधील आदिवासींमध्येही संसर्ग फैलावला आहे. याप्रकरणी जागतिक आरोग्य संघटनेने पत्र लिहून देखील सरकारने निर्बंध लादण्यास टाळाटाळ चालविली आहे.
ब्रिटनमध्ये नवा पुढाकार

ब्रिटनमधील बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यासाठी नवा पुढाकार घेतला आहे. ब्रिटनमध्ये सायकलने प्रवास करण्यासाठी जागरुकता मोहीम राबविली जाणार आहेत. या मोहिमेसाठी 2.48 कोटी डॉलर्सचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सायकलचा वापर वाढल्यास सार्वजनिक वाहतूक यंत्रणेला मदत होणार आहे. तेथील गर्दी कमी होऊन लोक शारीरिकदृष्टय़ा अधिक तंदुरुस्त होतील असा दावा परिवहन मंत्री ग्रांट शेप्स यांनी केला आहे.
अमेरिका : 2 अधिकारी विलगीकरणात

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना विरोधी लढय़ाकरता कृतिदलाची निर्मिती केली होती. या कृतिदलाचे दोन अधिकारी आता विलगीकरणात गेले आहेत. डॉक्टर रॉबर्ट रेडपील्ड हे सीडीएसचे संचालक आहेत. रेडपील्ड आता दोन आठवडे घरातूनच कामकाज सांभाळणार आहेत. याचबरोबर एफडीएफ आयुक्त स्टीफन हान देखील दोन आठवडय़ांसाठी विलगीकरणाचे पालन करतील. परंतु त्यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला आहे.
पाकिस्तानात संसर्ग वाढतोय

पाकिस्तानात 29,465 जणांना कोरोनाची लागण झाली असली तरीही इम्रान खान यांच्या सरकारने टाळेबंदी शिथिल करण्याचे धोरण अवलंबिले आहे. शनिवारपासून देशातील बहुतांश भागांमध्ये दुकाने आणि कारखाने सुरू करण्यात आले आहेत. परंतु तेथे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा प्रभाव यापूर्वीही दिसून आला नव्हता. मशिदींमध्ये सामूहिक प्रार्थनेवरील बंदी यापूर्वीच हटविण्यात आली होती. याप्रकरणी डॉक्टरांच्या संघटनेने सरकारला इशारा देखील दिला होता. परंतु डॉक्टरांचा सल्ला तसेच मागण्यांकडे पंतप्रधान इम्रान खान यांनी साफ दुर्लक्ष केले आहे.
युएईला भारताची मदत

आखाती देशांमधील कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. संयुक्त अरब अमिरातने कोरोना संकटादरम्यान भारताकडून मदत मागितली होती. या संकटाच्या काळात भारताने 88 आरोग्य कर्मचाऱयांना युएईत पाठविले आहे. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्रातील परिचारिकांचे पथक तेथे पोहोचले आहे. मालदीव, मादागास्कर, कोमोरोस आणि सेशेल्स या देशांनाही भारताने मदत पुरविली आहे.









