गोवा/प्रतिनिधी
चित्रपट रसिक आणि समीक्षक ज्याची आतुरतेने वाट बघता असतात, असा ५१ वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव –इफ्फी आजपासुन सुरु होत असून यंदा हा महोत्सव पहिल्यांदाच मिश्र स्वरूपात होणार आहे. इफ्फीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेते सुदीप उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, ऑनलाईन प्रसारणासाठी इफ्फीचा स्वतःचा ओटीटी प्लॅटफॉर्म असणार आहे. मास्टरक्लासेस, इन-कॉन्वेरसेशन सत्रे या सगळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवले जाणार आहेत तर प्रत्यक्ष स्वरूपात, विविध विभागातील चित्रपट आणि भारतीय पॅनोरामा मधील चित्रपट दाखवले जाणार आहेत.
शुक्रवारी पणजीत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. इफ्फीचे उद्घाटन आणि समारोप असे दोन्ही सोहळे ओटीटी प्लॅटफॉर्मवरून दाखवले जाणार असल्याने देशभरातील प्रतिनिधी ते ऑनलाईन पाहू शकतील. या महोत्सवादरम्यान एकूण ११९ चित्रपट दाखवले जाणार असून त्यापैकी ८५ चित्रपटांचे प्रीमियर शो इफ्फीमध्ये होणार आहेत, असेही ते म्हणाले.
इफ्फीच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते, सुदीप संजीव उपस्थित राहणार आहेत. अभिनेता म्हणून ओळखले जाणारे सुदीप, दिगदर्शक, निर्माते, पटकथालेखक, टीव्ही निवेदक आणि गायकही आहेत. त्यांनी प्रामुख्याने कन्नड चित्रपटांतून भूमिका केल्या असल्या तरी तेलगु, हिंदी आणि तमिळ चित्रपटात ही काम केले आहे.
पणजी इथे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणाऱ्या उद्घाटन समारंभाला, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर देखील उपस्थित राहतील.
डॅनिश चित्रपट निर्माते थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनादर राउंड’ या चित्रपटाने महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. डेन्मार्क कडून हा चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन देण्यात आले आहे. कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळावलेले यांची या चित्रपटात विशेष मॅड्स मिकेल्सन भूमिका आहे.
तर महोत्सवाची सांगता कियोस्की कुरोसावा यांच्या ‘वाईफ ऑफ अ स्पाय’ या चित्रपटाने होणार आहे.
जागतिक कीर्तीचे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक भारतरत्न सत्यजित रे यांच्या शताब्दीवर्षानिमित्त त्यांना या महोत्सवादरम्यान विशेष अभिवादन करण्यासाठी त्यांचे निवडक चित्रपट दाखवले जाणार आहेत. तसेच ‘मेहरुन्निसा’ या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर शो देखील महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे. फारुख जाफर या कसलेल्या अभिनेत्यांची विशेष भूमिका असलेल्या या चित्रपटात एका स्त्रीच्या स्वप्नाचा संपूर्ण आयुष्यभाराचा प्रवास वेधकपणे मांडण्यात आला आहे.
यंदाच्या इफ्फीमध्ये बांगलादेश ची फोकस कंट्री म्हणून निवड करण्यात आली असून या विभागाचे उद्घाटन बांगलादेश महावाणिज्य दूत मोहम्मद इम्रान यांच्या उपस्थितीत होणार आहे. या विभागात बांगलादेशातील दहा चित्रपट दाखवले जाणार असून त्यात, ‘रुपेशा नोदीर बांके’(रुपेशा नदी संथ वाहते), ‘सिन्सियरली युवर्स, ढाका!’ या सिनेमांचा समावेश आहे.
हा महोत्सवादरम्यान, कोरोना आजार प्रतिबंधनासाठी गृह मंत्रालयाने जाहीर केलेले सर्व प्रोटोकॉल पूर्णपणे पाळले जातील,अशी माहिती, सावंत यांनी दिली. कोविडच्या पार्श्वभूमीवर यंदा हा महोत्सव ऑनलाईन साजरा होत असून, त्यासाठी ई-तिकीट , ई-शेड्युलिंग ची व्यवस्था करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर ‘पिकॉक’ हे इफ्फी विशेष न्यूजलेटर देखील यंदा ऑनलाइन प्रकाशित केले जाईल.
इफ्फीच्या प्रत्यक्ष आणि ऑनलाईन फॉरमैटसाठी वेगवेगळी नोंदणी करण्यात आली आहे. दोन्ही प्रकारांच्या सहभागासाठीचे शुल्कही वेगवेगळे आहे. ज्यांना दोन्ही प्रकरात रुची आहे, त्यांनी त्यासाठी वेगवेगळी नोंदणी करायची आहे.









