ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर यांचे मत : कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जयंती सोहळा वरेरकर नाट्यासंघात उत्साहात
प्रतिनिधी / बेळगाव
सध्याच्या संगणकीय युगात प्रत्येक क्षेत्राला व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे चित्रकलेलाही व्यावसायिक दृष्टिकोन देणे काळाची गरज आहे. चित्रकला हा एक छंद म्हणून जोपासला जातो. परंतु, आयुष्याला आर्थिक स्थैर्याची गरज असल्याने व्यावसायिक दृष्टिकोन देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. चित्रकलेने आज मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती केली असून हा व्यावसायिकपणा भविष्यात वाढविण्याची गरज आहे, असे मत वेंगुर्ला येथील ख्यातनाम चित्रकार अरुण दाभोलकर यांनी व्यक्त केले.
कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जयंती सोहळा रविवार दि. 5 रोजी आयोजित करण्यात आला होता. वरेरकर नाट्या संघाच्या के. बी. कुलकर्णी दालनामध्ये चित्रप्रदर्शन व इतर कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अरुण दाभोलकर बोलत होते. व्यासपीठावर व्यंगचित्रकार जगदीश कुंटे, प्रभाताई कुलकर्णी व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक दिलीप चिटणीस उपस्थित होते.

दाभोलकर पुढे म्हणाले, प्रत्येक कलाकाराच्या हातामध्ये एक वेगळी कला असते. ती चित्र, साहित्य, कविता यांच्या माध्यमातून बाहेर येत असते. चित्र काढणे इतकेच चित्रकाराचे काम नसून ते चित्र रसिकांपर्यंत पोहोचविणेही काळाची गरज आहे. आयुष्यात कोणती संधी कोणत्या रुपाने येईल, हे सांगता येत नाही. मी जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या प्रवेश परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण ठरलो होतो. त्यानंतर काही वर्षांनी त्याच स्कूलमध्ये राज्यातून पहिला आलो. काही दिवसांनी ‘दाभोलकर शैली’ या विषयावर स्वतंत्र परीक्षाही घेण्यात आली. त्यामुळे नैराश्य आले तर तेथे न थांबता ती एक संधी आहे, म्हणून त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे.
के. बी. कुलकर्णी म्हणजे ज्ञानपीठ
कलामहर्षी के. बी. कुलकर्णी म्हणजे चित्रकला क्षेत्रातील एक ज्ञानपीठच. जॉन फर्नांडिस, रवि परांजपे यासारखे चित्रकार के. बीं. च्या शैलीमुळे घडू शकले. त्यांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे कमी बोलावे आणि जास्त काम करावे. चित्रकला क्षेत्रातील एक उत्तुंग नाव म्हणजे के. बी. कुलकर्णी. त्यांनी पेरलेल्या बीजांमुळे आज अनेक विद्यार्थी घडू शकले, असे गौरवोद्गार दाभोलकर यांनी काढले.
विजेत्यांना बक्षिसांचे वितरण
के. बी. कुलकर्णी जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जे. एन. भंडारी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये ज्युनियर गटात प्रथम रुतिका यलमळी, द्वितीय साक्षी पाटील, तृतीय आदित्य सुतार, उत्तेजनार्थ श्रीनिवास जाधव व शिवानंद रेडेकर, सिनियर विभाग- प्रथम उदय सुतार, द्वितीय यमुना पिंगट, तृतीय संदेश कडू, उत्तेजनार्थ सुमित खन्नुकर व नेहा शिंदे यांनी क्रमांक पटकाविले. मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला. परीक्षक म्हणून सचिन उपाध्ये, चंद्रशेखर रांगणेकर, बाळू सदलगे यांनी काम पाहिले.
मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित
या सोहळ्यामध्ये जीवनगौरव व कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार वसई येथील शंकर मोदगेकर यांना देण्यात आला. त्यांचे पुत्र समीर मोदगेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्याचबरोबर पुणे येथील अनघा देशपांडे यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर के. बी. कुलकर्णी कला दालनाच्या रेलिंगला उत्तम प्रकारे सजावट केल्याबद्दल डिझायनर दर्शन चौधरी यांचाही सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अरुण दाभोलकर यांच्या हस्ते के. बी. लिगसी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. जगदीश कुंटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रुती परांजपे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. वृषाली मराठे यांनी सूत्रसंचालन केले तर स्मिता कुलकर्णी यांनी आभार मानले.









