सावंतवाडी शहरात आता एकच रुग्ण
प्रतिनिधी / सावंतवाडी:
सावंतवाडीतील सर्व आठही ‘कोरोना’ रुग्णाना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक दिवसांपूर्वी तीन तर बुधवारी पाच रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे सावंतवाडीकरांना दिलासा मिळाला आहे. आता चितारआळीचा कंटेनमेंट झोन बुधवारी मध्यरात्रीपासून उठविण्यात आला. गुरुवारपासून चितारआळीची बाजारपेठ पूर्ववत सुरू होणार आहे. गणेश चतुर्थी उत्सवासाठी चितारआळीची लाकडी खेळणी दुकाने पूर्ववत सजणार आहेत. शहरात आता एकच ‘कोरोना’ रुग्ण असून तो क्वारंटाईन असलेला सालईवाडा भागातील आहे.
सावंतवाडी-चितारआळीत ठाण्यातून आलेल्या दांपत्यामुळे ‘कोरोना’ फैलावला होता. सदर दांपत्य अनेकांच्या संपर्कात आलेले होते. त्यामुळे शहरात ‘कोरोना’ची भीती होती. परंतु पालिक प्रशासनाने योग्य पावले उचलत ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यात यश मिळविले. रुग्णांचा आकडा आठपर्यंत मर्यादित राहिला. चितारआळी परिसर कंटेनमेंट झोन 5 ऑगस्टपर्यंत जाहीर करण्यात आला होता. त्याची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे चितारआळी गुरुवारपासून पूर्ववत गजबजणार आहे. शहरात नगराध्यक्ष संजू परब, पालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मसुरकर, आरोग्य निरीक्षक रसिका नाडकर्णी यांनी ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली. तसेच चितारआळीतील नागरिकांनीही सहकार्य केले.









