उचगांव /वार्ताहर
चाळीस रुपयाची उधारी वसूल करण्याच्या कारणावरून दारु पिताना वादावादी होवून अनिल उर्फ रोहिदास उल्हास कांबळे ( वय २८)रा. वसगडे याचा गळा दाबून खून करण्याची घटना वसगडे ता.करवीर येथे बुधवारी दि ६ रोजी रात्री नऊच्या सुमारास वसगडे समाज मंदिरात घडली. याबाबत संशयीत म्हणून जगदीश नायकू कांबळे (वय २७ )रा. वसगडे याला गांधीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले .
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी वसगडे ता. करवीर येथील समाज मंदिरामध्ये अनिल व जगदीश हे दारूच्या नशेत बसले होते त्यांच्यात मागील चाळीस रुपयांच्या उधारी साठी दोघांमध्ये सुरुवातीला शिवीगाळ सुरू झाली. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले दरम्यान जगदीश ने अनिल याचा गळा दाबला त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर जगदीश हा घटनास्थळावरून पसार झाला होता. समाज मंदिरांमधील निपचित पडलेल्या अनिलला त्याच्या नातेवाईकांनी गांधीनगर येथील वसाहत रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ही माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर उपनिरीक्षक अतुल कदम, मलमे, मोहन गवळी, चेतन भोंगाळे संदीप सावंत, आकाश पाटील, आयुब शेख, विराज डांगे, सुभाष सुदर्शन आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कृष्णात पिंगळे यांनी संशयित जगदीश कांबळे याला गावातूनच ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच करवीरचे उपविभागीय अधिकारी डॉ प्रशांत अमृतकर यांनीही घटनास्थळी भेट दिली.मृतदेहाची उत्तरीय तपासणी सीपीआरमध्ये करण्यात आली. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा झाली.
Previous Articleसरस्वती वाचनालयाचे कामकाज पूर्ववत सुरू
Next Article एनसीसीतील कामगिरीबद्दल विराज कुलकर्णी याचा गौरव









