प्रतिनिधी / सातारा :
दुचाकीवरून निघालेल्या एकाला तिघांनी चालत्या गाडीवर डोक्यात आणि पोटावर मारून जखमी केले. तसेच त्याच्याजवळील पाकिटात असलेले 15 हजार रूपये चोरून नेल्याने तीन इसमाविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गणेश सदाशिव पवार (वय 42, सैदापूर ता. सातारा) यांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश पवार हे दि. 26 रोजी वर्ये ता. सातारा गावच्या हद्दीतून मोटार सायकल वरून निघाले होते. यावेळी सर्व्हिस रोडलगत असणाऱ्या ऑईलमिल शेजारी रस्त्यावर पाठीमागून तीन इसम पल्सर गाडीवरून आले. त्यांनी चालत्या गाडीवर असताना गणेश यांच्या डोक्यात व पोटावर कशातरी सहाय्याने मारून जखमी केले. तोच एकाने त्यांच्या खिशातील पाकीट ओढून घेतले. त्या पाकिटात 15 हजार रूपये रोख रक्कम होती ती चोरून नेली. या घटनेमुळे गणेश हे घाबरले त्यांनी आरडाओरडा केला परंतु त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही. त्यांनी थेट तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत या इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहेत.









