इन्सुली बिलेवाडी येथील घटना : विवाहित प्रियकराला अटक
दोघेही बीडचे रहिवासी : पती-पत्नी असल्याचे भासवत घेतला होता आसरा
प्रतिनिधी / बांदा:
चारित्र्याच्या संशयावरून विवाहित प्रियकराने प्रेयसीवर पाळाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना इन्सुलीत शुक्रवारी पहाटे घडली. या हल्ल्यात लता तुळशीदास शिंदे (42, रा. काचरवाडी, ता. केज, जि. बीड) हिच्या मानेला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तात्याराम गोविंदराव साठे (49, रा. काचरवाडी, ता. केज, जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल करून बांदा पोलिसांनी अटक केली. जखमी व संशयित दोघेही विवाहित असून गेले पाच महिने इन्सुलीत पती-पत्नी असल्याचे भासवत संसार थाटला होता. मात्र, या घटनेने त्यांचा बनाव उघड झाला. याबाबतची तक्रार स्थानिक शेतकरी प्रदीप रघुनाथ सावंत यांनी बांदा पोलिसांत दिली.
याबाबत बांदा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील तात्याराम साठे हा इन्सुली-बिलेवाडी येथील चंद्रकांत हनुमंत सावंत यांच्याकडे पाच महिन्यापासून भाडय़ाने राहत होता. त्याच्यासोबत असलेली लता शिंदे (शोभा साठे) ही आपली पत्नी असल्याचे तो भासवत होता. दोघेही हरिश्चंद्र तारी यांच्याकडे बांबू तोडणीचे व इतर वेळेत गावातच मोलमजुरीचे काम करत असत.
मोबाईल कॉलने पडली ठिणगी
संशयित तात्याराम याचे कुटुंब बीड येथे असून त्याच्या घरी पत्नी व दोन मुलगे आहेत. सिंधुदुर्गात कामाला जातो, असे घरी सांगून तो प्रेयसी लतासह इन्सुलीत येऊन भाडय़ाने राहत होता. त्याने काही दिवसांपूर्वी गावी जायचे ठरविले होते. मात्र, त्याच्या घरी त्याच्या विवाहबाहय़ संबंधाची माहिती नव्हती. शुक्रवारी सकाळी तो गावी निघणार होता. त्यावेळी प्रेयसी लताची सोय बीड येथे तालुक्याच्या ठिकाणी करणार असल्याचे तिला सांगितले होते. गुरुवारी सायंकाळी लता हिने घरात कोणी नसल्याचे पाहून आपल्या जुन्या मित्राला मोबाईलवर कॉल करत आपण गावी येणार असून बीडमध्ये पंधरा दिवस राहणार आहे. तेव्हा तात्याराम सोबत नसल्याने आपण रुमवर भेटू, असे सांगितले. मात्र, त्यांचे संभाषण तात्यारामने लपून ऐकले. त्यावरून त्यांचे भांडण झाले.
पहाटे केला वार
या प्रकाराने संतप्त झालेल्या तात्यारामने तिच्याशी वाद घातला. रात्री उशिरा वाद विकोपास गेला. त्या रागातून पहाटे तात्याराम याने पाळाच्या सहाय्याने लता हिच्या मानेवर व डोक्यावर वार केला. यात तिच्या मानेला गंभीर दुखापत झाली. रक्तबंबाळ अवस्थेत ती मदतीसाठी बाहेर पळाली. येथील शेतकरी प्रदीप सावंत हे आपल्या शेतात सकाळी साडेसातच्या सुमारास जात असताना घराच्या अंगणात रक्ताच्या थारोळय़ात लता पडल्याचे दिसले. तर प्रियकर तात्याराम बीडला जाण्याच्या तयारीत होता.
प्रदीप यांनी याबाबतची माहिती हरिश्चंद्र तारी, अमित सावंत, संतोष मांजरेकर, तानाजी सावंत यांना दिली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या तात्यारामला
ग्रामस्थांनी ताब्यात घेतले. तर जखमी लता शिंदे हिला लागलीच खासगी वाहनाने उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. सोबत तात्याराम साठे याला घेतले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी प्राथमिक उपचार करून लता हिला बांबोळी येथे हलविले. तर पोलिसांनी तात्यारामला अटक केली.
बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तात्याराम व लता यांच्याकडे रोख रक्कम व दागिने सापडले असून ते बांदा पोलिसांनी ताब्यात घेतले. तात्यारामने प्राथमिक चौकशीदरम्यान लता ही आपली प्रेयसी असून बनावट नावाने ती राहत होती, असे कबूल केले. प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तात्यारामवर गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पी. एस. पवार करत आहेत.
लता आणि तात्यारामचे होते प्रेमसंबध
लता आणि तात्याराम हे एकाच गावातील रहिवासी असून त्यांच्यात दोन वर्षे प्रेमसंबंध होते. लता हिने आपल्या पतीला न सांगताच घर सोडले होते. घरचे दागिने घेऊन ती तात्यारामसोबत इन्सुलीत आली होती. तिच्या पतीने तेथील पोलीस ठाण्यात तात्याराम साठे याने आपल्या पत्नीला पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. तर तात्याराम याचेही लग्न झाले असून त्याला दोन मोठी मुले आहेत. एक मुलगी बारावीत शिक्षण घेत आहे. मुलांना विचारणा केली असता आपली आई आपल्यासोबत असून लता कोण, याबाबत माहिती नसल्याचे फोनवर बांदा पोलिसांना सांगितले.
पाच महिने राहत होती इन्सुलीत
लता आणि तात्याराम इन्सुली-बिलेवाडी येथे गेले पाच महिने भाडय़ाने राहत होते. दरम्यानच्या काळात आपण पती-पत्नी असल्याचे स्थानिकांना सांगत. त्यांची वागणूकही पती-पत्नीसारखी होती. तसेच स्थानिकांच्या घरगुती कार्यक्रमातही त्यांचा सहभाग असायचा. आपण पंढरपूरचे वारकरी असल्याचे ते सांगत होते. त्यामुळे स्थानिकांनाही त्यांच्यावर संशय नव्हता.









