रोगाची दुसरी लाट येऊ नये म्हणून जसे लोकांनी सतर्क रहायला हवे तसे किमान यापुढे तरी चाचणीचे प्रमाण वाढवून रोगाला अटकाव केला पाहिजे. केंद्र सरकारने सुचवलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात चाचण्या करून कोकणाने नवा आदर्श घालून द्यावा
सगळ्यांना डोकेदुखी ठरलेला कोविडसारख्या रोगाची तीव्रता आता कमी होईल अशी शक्यता दिसून येत आहे. पुढच्या काही दिवसात हा आलेख आणखी खाली येऊन कोरोनाची भीती संपेल अशी आशा व्यक्त होत आहे. तथापि कोणत्याही पातळीवर ढिले राहणे परवडणारे नाही. कमी येणारा आलेख कोणत्याही क्षणी विरुद्ध दिशेला जाऊ शकतो. आरोग्य विषयातील तज्ञदेखील अखंड सावधानतेची गरज प्रतिपादन करत असतात. सिंधुदुर्ग जिह्यात आतापर्यंत 4,000 पेक्षा जास्त लोकांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सुमारे 500च्या आसपास रुग्ण उपचार घेत आहेत. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने हा आलेख लवकरच शून्यावर येईल अशी आशा तेथे व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अगदी दखलपात्र झाले आहे. 93.26 टक्के एवढे रूग्ण बरे होऊन आपापल्या घरी परतले आहेत. म्हणजे 7800 लोक आपापल्या नियमित जीवनात परतले आहेत. आतापर्यंत सुमारे 8400 लोक रत्नागिरी जिह्यात बाधित आढळले आहेत. आता बाधित होण्याचा दर कमी झाला असून गेल्या 15 दिवसात कधीही बाधितांची संख्या 100 पेक्षा जास्त नोंदवली गेली नाही.
एका बाजूला रत्नागिरी-सिंधुदुर्गसह रायगड जिह्यात कोरोना रूग्णांचे मान कमी होत असल्याचे आढळत असले तरी चाचण्यांचा दर मात्र फारच कमी असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. पेंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सांगितले आहे की, एक बाधित व्यक्ती आढळून आल्यास त्याच्या वावराचा माग काढावा. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या किमान 20 व्यक्तींची तपासणी न चुकता करावी. रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत 8400 एवढे लोक बाधित असल्याचे आढळले. केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे 1 लाख 68 हजार एवढय़ा तपासण्या होणे आवश्यक आहे. तथापि या तपासण्या फारच कमी झाल्या असल्याची आकडेवारी आरोग्य विभागाने दिली आहे. रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत 55,752 एवढय़ा चाचण्या झाल्या. यामध्ये 4079 स्वॅब तर 3404 ऍन्टीजेन चाचण्या यांचा समावेश आहे. हे प्रमाण एका रूग्णामागे 6.65 एवढे आहे. एका रूग्णामागे किमान 20 चाचण्या घेण्याच्या सूचना केंद्र सरकारने केलेल्या असताना या चाचण्या केवळ 6.65 एवढय़ा झाल्याचे दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिह्याचीही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. त्या जिह्यात 4,759 जण बाधित असल्याचे आढळून आले. तेथे 19,396 एवढय़ा आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. ऍन्टीजेन चाचण्यांची संख्या 13312 एवढी नोंदवली गेली आहे. एका रूग्णामागे 6.80 एवढय़ा तपासण्या झाल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी जिह्यातील दरापेक्षा सिंधुदुर्गातील चाचण्यांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. राज्याचा दर एका रूग्णामागे 4.2 एवढा असल्याची माहिती पुढे आली आहे.
राज्यातील आरोग्य विभागाच्या कामापेक्षा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आरोग्य विभागाचे काम काहीअंशी पुढे असल्याचे समाधान ज्यांना करून घ्यायचे आहे त्यांनी तसे जरूर मानावे. पण केंद्र सरकारने सुचविलेल्या किमान चाचणीच्या जवळदेखील ही आकडेवारी जात असल्याचे दिसत नाही. केंद्राने सुचवलेल्या प्रमाणाचा पाठपुरावा केला असता तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील कोरोना साथीचा विळखा यापूर्वीच सैल झाला असता असे म्हणण्यास पुरेशी जागा आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या अखत्यारीतील ग्रामीण रूग्णालये यांच्या साथीने कोरोना चाचण्यांचा वेग वाढवणे अपेक्षित होते. दोन्ही जिह्यात चाचणीचा अपेक्षित दर गाठला गेला नाही. त्याला आरोग्य विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. शिवाय आरोग्य विभागाशी समन्वय साधणाऱया प्रशासकीय अधिकाऱयांना आपली जबाबदारी झटकता येणारी नाही.प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी योग्य प्रकारे काम करतात की, नाही हे पाहून त्यांना उचित सूचना करण्याची जबाबदारी शासनातील लोकांची आहे. कोरोना तपासणीबाबत झालेल्या हेळसांडीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱयांना दोष दुसऱयावर टाकता येणार नाही. कोरोना प्रतिबंधासाठी जबाबदारी लोकांवर ढकलता येत असली तरी तपासणीची कामे शासकीय यंत्रणेकडून पूर्ण होणे अपेक्षित
आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यात राज्याच्या तुलनेमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण अधिक असले तरी समाधान मानण्याची परिस्थिती अजिबात नाही. युरोप अमेरिकेसह जगात अनेक ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट येत आहे. केरळमध्ये दुसऱया लाटेची भीती निर्माण झाली आहे. असे असताना कोकणात दुसरी लाट येणार नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल. रोगाची दुसरी लाट येऊ नये म्हणून जसे लोकांनी सतर्क रहायला हवे तसे किमान यापुढे तरी चाचणीचे प्रमाण वाढवून रोगाला अटकाव केला पाहिजे. केंद्र सरकारने सुचवलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात चाचण्या करून कोकणाने नवा आदर्श घालून द्यावा. त्यासाठी सरकारमधील जबाबदारांनी पुढाकार घ्यायला हवा.
कोरोनावर उपचार नाहीत. त्याचा प्रसार होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत एवढेच सर्वांच्या हाती आहे. मास्क, सतत हात धुणे आणि सामाजिक अंतर यासारख्या बाबी रोगापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकाने स्वीकारल्या पाहिजेत. केवळ देशातलेच नव्हे तर जागतिक स्तरावरील आरोग्य तज्ञ त्याचा आग्रह धरत आहेत. लोकांच्या पातळीवर या तीन बाबीत तडजोड करू नये असे सांगितले जात आहे. प्रशासनाच्या पातळीवर अजून काही मुद्यांची पूर्तता करणे नक्कीच आवश्यक आहे. त्यामध्ये चाचण्यांची संख्या वाढवणे हा महत्त्वाचा टप्पा आहे.








