शेकडो मुंबईकर लवेलमध्ये विलग 319 चाकरमान्यांचे स्वॅब
प्रतिनिधी/ खेड
मुंबईतील हॉटस्पॉट परिसरातून शेकडोच्या संख्येने चाकरमानी जिल्हय़ात दाखल होऊ लागले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शेकडोंच्या संख्येने येणाऱया चाकरमान्यांमुळे प्रशासकीय यंत्रणांवरीलही ताण वाढला आहे. कशेडी चेकपोस्टवर या गाडय़ा अडवून चाकरमान्यांना दोन एस.टी. बसमधून लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विलगीकरण केले जात आहे. दिवसभरात 319 जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी मिरजेला पाठवण्यात आले.
लॉकडाऊनमुळे गावी येणाऱया चाकरमान्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत गावची वाट धरली आहे. गेल्या दोन दिवसांपासून खासगी वाहनांमधून गावी येणाऱया चाकरमान्यांचा ओघ वाढला आहे. काही चाकरमांनी रितसर प्रवासाचा परवाना काढून येत असले तरी अनेकजण रेल्वे ट्रकसह अत्यावश्यक सेवांच्या वाहनांतून लपून-छपून प्रवास करत असल्याने पोलिसांनी कशेडी येथे तपासणी नाक्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. याठिकाणी कडक तपासणी होत असल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन चाकरमान्यांनाही तिष्ठत बसावे लागत आहे.
मुंबई, पुणेसह अन्य शहरातून कोकणात दाखल होणाऱया चाकरमान्यांची मेठी गर्दी झाल्याने त्यांच्या तपासणीसह स्वॅब घेताना आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडत आहे. लवेल येथील घरडाच्या कक्षात तब्बल 319 जणांचे स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले. यातील दोनशेहून अधिकजणांना त्या त्या तालुक्यात धाडण्यात आले असून अन्य चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापूर्वी येथील कक्षात 60 जण निगराणीखाली होते. त्यात आणखी 80 जणांची नव्याने भर पडल्याने याठिकाणच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षात देखरेखीखाली असलेल्या नागरिकांची संख्या 140 वर पोहचली आहे.
आमदार योगेश कदम यांच्याकडून पाहणी
शुक्रवारी अचानक वाढलेल्या चाकरमान्यांच्या संख्येमुळे प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. अनेकांना स्वॅबचे नमुने घेण्यासाठी ताटकळत बसावे लागले होते. प्रशासनाकडून नाष्टय़ासह जेवणाची व्यवस्था करण्यास विलंब लावल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. अनेकांनी याबाबत केलेल्या तक्रारींची दखल घेत आमदार योगेश कदम यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन उपाययोजनांची पाहणी केली. याठिकाणी नागरिकांना देण्यात येणाऱया जेवण व निवासाच्या व्यवस्थेचा आढावा घेत तेथील वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाच्या अधिकाऱयांना तप्तरतेच्या सूचना केल्या. या नागरिकांची कुठल्याहीप्रकारची गैरसोय होणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या.
याप्रसंगी प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, पंचायत समिती सभापती विजय कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. ए. मारकड आदी उपस्थित होते.
बहिरवलीचा रूग्ण कळंबणी रूग्णालयात
संस्थात्मक विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करून मिरज येथे पाठवण्यात आलेल्या आणखी 76जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील कक्षात 7 जण क्वारंटाईन असून तिघेजण आयसोलेशनमध्ये आहेत. मंडणगड येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या बहिरवली-लाडवाडी येथील 22 वर्षिय तरूणास कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चाकरमान्यांमुळे पेढांबेही हाऊसफुल्ल
गेल्या दोन दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर जिल्हयात येत असलेल्या मुंबई-पुण्यातील चाकरमान्यांमुळे प्रशासनावरील ताण वाढला. खेड तालुक्यातील कशेडी तपासणी नाक्यावरून लवेलवरील ताण कमी करण्यासाठी काही प्रवाशांना वैद्यकीय तपासणीसह विलगीकरणासाठी चिपळुणात पाठवले जात आहे. त्यामुळे पेढांबे येथील संस्थात्मक विलगीकरण कक्ष हाऊसफुल्ल होत चालले असून प्रशासनाने पर्यायी जागांचा शोध सुरू केला आहे.









