चांदोली प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन 16 व्या दिवशीही सुरुच
प्रतिनिधी / कोल्हापूर
चांदोली व वारणा प्रकल्पग्रस्तांना जमिन व भूखंड वाटपाचे आदेश 25 मार्चपर्यंत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय सोमवारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. यासह विविध प्रश्नांवरही चर्चा होऊन निर्णय झाले. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चांदोली प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत धरणे आंदोलन 15 व्या दिवशीही सुरु राहीले. कसबा बावडा येथील जिल्हा पुनर्वसन कार्यालय येथे जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे यांची आंदोलक प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यामध्ये विविध प्रश्नांवर चर्चा झाली.
बैठकीतील चर्चा अशी, शाहुवाडी तालुक्यातील मुलकीपड जमिनीच्या गट नंबरची यादी 30 मार्चपर्यंत माहिती घेतली जाईल. हातकणंगले तालुक्यातील 150 हेक्टर गायरान जमिन, शिरोळ तालुक्यातील 111 हेक्टर व 215 हेक्टर जमिनीच्या संबंधित वन विभागाच्या अधिकार्यांना फोन करुन या जमिनीचा प्रस्ताव कोणत्या कार्यालयात आहे, याची माहिती घेतली जाईल. असे जिल्हा पुनर्वसन अधिकार्यांनी सांगितले. सोनार्ली व दुर्गेवाडी या गावचा निर्वाह भत्ता, शौचालय अनुदान, गोठा अनुदान, घरबांधणी अनुदान या याद्या संकलन चौकशी करुन ही यादी इस्लामपूरचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पाठविण्यात येईल, गोठणे वसाहत येथील मस्जिदीचे आदेश दुरुस्त करुन आठ दिवसात देतो असे जिरंगे यांनी सांगितले.
सोनार्ली वसाहत येथील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सोनार्ली गावच्या देवालयाच्या भूखंडाची व दुर्गेवाडी देवालयाच्या भूखंडाचे आदेश करण्याचे ठरले. जैनापूर-दानोळीर येथील जमिनीचे अडथळा असलेल्या केसेसची चौकशी करुन ताबे देण्याचे ठरले.यावेळी पुनर्वसन तहसिलदार वैभव पिलारे, श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मारुती पाटील, डी. के. बोडके, अशोक पाटील, बाळू पाटील, शामराव उंडे, आनंदा आमकर, पांडुरंग कोठारी, धोंडीबा पोवार, विनोद बडते आदी प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.









