मैत्रिणींनो, उन्हाळ्यात पचायला हलकं अन्न खावं. मात्र टाळेबंदीच्या काळात आपण तेलकट, तुपकट आणि पचायला जड पदार्थ हादडत असतो. मग पोट खराब होतं. म्हणूनच पोटाला आराम देण्यासाठी पचायला हलका आणि चविष्ट दहीभात करता येईल.
साहित्य : एक वाटी तांदूळ, कढीपत्त्याची 10 ते 12 पानं, अर्धा चमचा मोहरी, कोथिंबिर, हिरवी मिरची, लाल मिरची, दही, हिंग आणि मीठ
कृती : भात शिजवून घ्या. थोडा थंड होऊ द्या. मग या भातात दही घालून कालवून घ्या. त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि मीठ घाला. आता या दहीभाताला फोडणी द्यायची आहे. यासाठी तडका पॅनमध्ये थोडं तेल घाला. गरम झाल्यावर मोहरी घाला. तडतडू द्या. मग हिंग आणि कढीपत्ता घाला. लाल मिरची घाला. हा तडका दही भातावर घालून हलवून घ्या. वरून कोथिंबिर घाला. लोणचं आणि पापडासोबत खायला द्या.









