उद्योग खात्री योजनेतून नवीन उपक्रम : अर्ज क्रमांक 6 भरून गावातच कामाची तरतूद
प्रतिनिधी / बेळगाव
उद्योग खात्री योजनेतून नदी, नाले आणि इतर सर्व कामे करण्यासाठी कामगारांची झुंबड उडत आहे. त्यामुळे अनेकांना गावात काम मिळणे कठीण झाले होते. आता उद्योग खात्री योजनेतून नवीन तरतूद केली असून ‘गाव स्वच्छ करूया आणि गावातच काम करूया’ अशी नवीन योजना राबविण्यात येत आहे. यासाठी कामगारांकडून अर्ज क्रमांक 6 भरून घेण्यात येत आहे. यापूर्वीही उद्योग खात्रीतून योजनेतून गावातच काम करण्याची तरतूद होती. मात्र, कालांतराने यामध्ये कामगारांची संख्या वाढत गेली आणि गावात काम मिळणे दुरापास्त होत गेले. त्यामुळे अनेकांना 20 ते 25 कि.मी.चा प्रवास करून काम करावे लागत होते.
ग्राम पंचायतीवर पडणार भार
आता अर्ज क्रमांक 6 मध्ये गावातच काम उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यामुळे यापुढे ग्राम पंचायतीवर याचा भार पडणार आहे. बेळगाव तालुक्मयासह इतर जिह्यातही ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे पायपीट करण्यासाठी कामगारांचे होणारे हाल काही अंशी थांबणार आहेत. बेळगाव जिह्यात ही योजना राबविण्यासाठी अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गावचा विकास हाच ध्यास असेच कामगारांतून बोलले जात आहे.
बेळगाव तालुक्मयात दररोज 7 ते 8 हजार कामगार काम करत असतात. प्रत्येक गावात 1 ते 4 हजार कामगार आहेत. त्यामुळे एवढय़ा लोकांना गावात काम उपलब्ध करून देण्यासाठी ग्राम पंचायतीला मोठी कसरत करावी लागणार आहे. परिणामी अर्ज क्रमांक 6 भरण्यात येत असल्याने आता ग्राम पंचायतींना गावात काम उपलब्ध करून देणे अनिवार्य असणार आहे. त्यामुळे ‘गाव स्वच्छ करूया आणि गावातच काम करूया’ ही योजना कुठपर्यंत यशस्वी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.









