राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची तयारी
प्रतिनिधी/ मडगाव
बाणावलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव हे 29 नोव्हेंबर रोजी महत्त्वाचा राजकीय निर्णय घेणार आहेत. काल प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात युती होत नसल्याने आपण 29 रोजी राजकीय निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. चर्चिल आलेमाव हे राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व गोवा फॉरवर्डकडे युतीची बोलणी सुरू असल्याची घोषणा काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केली होती. मात्र, युतीची बोलणी होत असल्याचे सांगितले जात असले तरी त्याला विलंब होत आहे. युती लवकर व्हावी अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेस व गोवा फॉरवर्डने देखील व्यक्त केलेली आहे. मात्र, युतीस विलंब होत असल्याने चर्चिल आलेमाव यांनी नाराजी व्यक्त केली. आपण आणखीन वाट पाहू शकत नाही असे सांगत त्यांनी 29 रोजी राजकीय निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
आपण राष्ट्रवादीत थांबणार की नाही तसेच इतर पक्षात जाणार हे 29 रोजीच स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, उपलब्ध माहिती प्रमाणे, चर्चिल आलेमाव हे आपली कन्या वालंका आलेमाव यांच्यासाठी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. काँग्रेस पक्षाशी युती केल्यास वालंका आलेमाव यांना उमेदवारी मिळणे कठीण होते. कारण, नावेली मतदारसंघात काँग्रेस पक्षाने माजी आमदार आवेर्तान फुर्तादो यांना पक्षात घेतले असून त्यांच्याकडे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. सध्या भाजपला टक्कर देण्यासाठी ममता बॅनर्जी याच योग्य असल्याचे सांगून चर्चिलने त्यांचे गुणगान गाण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चर्चिल आलेमाव व वालंका आलेमाव हे दोघेही आता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे.
भाजपकडील संबंधच युतीत अडथळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गेली चार वर्षे भाजपला पाठिंबा दिला. त्यांनी उघडरित्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे समर्थन केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या युतीत अडथळे येत आहे. तीच परिस्थिती गोवा फॉरवर्डची आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर येण्यास गोवा फॉरवर्ड कारणीभूत ठरले. हाच मुद्दा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहचला असून स्वतः राहुल गांधी जोपर्यंत निर्णय घेत नाही. तोपर्यंत युती कोणे कठीण आहे.
युतीची बोलणी सुरू आहे असे सांगून सर्वांना झुलत ठेवायचे व शेवटच्या क्षणी युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढविणे असा डावपेच काँग्रेसच्या काही नेत्यांनी आखला आहे.
गोवा फॉरवर्डकडेसुद्धा युती करण्यास काँग्रेस पक्षाचा एक गट विरोध करीत आहे. त्यात प्रामुख्याने प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर व खा. फ्रान्सिस सार्दिन यांचा समावेश आहे. गिरीश चोडणकर व खा. सार्दिन यांनी काँग्रेसने अन्य पक्षाबरोबर युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.









