प्रतिनिधी/ बेळगाव
शहर परिसरात नागचतुर्थी श्रद्धेने साजरी झाली. घरोघरी नागाच्या मूर्ती आणून त्यांची पूजा झाली. चतुर्थीला नागाची मूर्ती आणून पूजा केली जाते. पंचमीला दुसरी नागमूर्ती आणून दोन्ही मूर्तींची एकत्रित पूजा केली जाते. यामुळे बाजारपेठेत नागमूर्तींसह अन्य साहित्यांची खरेदी झाली.
काही ठिकाणी नागाच्या मूर्ती आळूच्या पानावर आणल्या जातात. त्यामुळे बाजारपेठेत आळूची आवक वाढली. चतुर्थी दिवशीच श्रावण शुक्रवार आल्याने गौरी प्रति÷ापनेसाठीसुद्धा फुले, माळा, हार, श्रीफळ आणि प्रामुख्याने वाळूक याची आवक वाढली. श्रावण शुक्रवारी गौरीची प्रति÷ापना केल्यानंतर वाळकाच्या खापांनी ओटी भरली जाते. म्हणून या काळात वाळकाची आवक वाढली आहे.
दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱया कपिलेश्वर मंदिरामध्ये नाग प्रतिमा असून त्याचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या मंदिरात नाग प्रतिमांची पूजा करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून आली. अर्थात मंदिर समितीने सामाजिक अंतराचे पालन करून गर्दी नियंत्रित केली.
दरम्यान दरवर्षी पंचमीला महिला आवर्जून बांगडय़ा भरतात. परंतु यंदा मात्र महिलांनी ही बाब हेतूत: टाळली. बांगडय़ा भरणाऱया कासार महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर महिलांनी त्याचा धसकाच घेतला आहे. त्यामुळे यंदा पूर्वीच्या तुलनेत बांगडय़ांची खरेदी झालेली नाही.









