ऑनलाईन टीम / चंदीगड :
91 वर्षीय फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काल रात्री उशिरा त्यांना 101 डिग्री ताप आला होता. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. सध्या ते स्वतः च्या घरात विलगीकरणात आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मिल्खा सिंग यांच्या सह त्यांच्या घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांच्या घरातील दोन नोकर पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या पत्नी निर्मला मिल्खा सिंग, सून कुदरत आणि नातू हरजल मिल्खा सिंग यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
मिल्खा सिंग यांनी आपल्या धावण्याच्या विलक्षण शैलीने जगभर भारताला पदके मिळवून दिली आणि फ्लाइंग सिख ही उपाधी मिळवली. पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख फिल्ड मार्शल आयुब खान यांनी त्यांना हा खिताब दिला होता. आशियाई खेळांमध्ये त्यांनी 4 तर राष्ट्रकूल स्पर्धेत एक सुवर्णपद जिंकले आहे.









