दक्षिण विभागातील काही वॉर्डांमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा, काही ठिकाणी मतदानासाठी अमाप उत्साह,

प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावची मानबिंदू असलेल्या महापालिकेच्या सातव्या सभागृहासाठी शुक्रवारी मतदान झाले. शहरात काही ठिकाणी वादाचे प्रसंग वगळता सर्वत्र शांततेत आणि सुरळीत मतदान झाले. मात्र, निवडणूक यंत्रणेच्या गैरसोयीचा फटका मतदारांना बसला. तसेच मतदारयादीच्या घोळामुळे नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.
मतदान करण्यास मतदारांनी सकाळपासून रांगा लावल्या होत्या. नोकरदार, व्यावसायिक तसेच कामावर जाणाऱया मतदारांनी सकाळी पहिल्या टप्प्यात मतदान करण्याचे पसंत केले. यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. काही ठिकाणी मतदान करण्यास वेळ लागत होता. शहराच्या दक्षिण विभागातील काही वॉर्डांमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे निवडणूक चुरशीची असल्याचे चिन्ह दिसत होते. काही वॉर्डांमध्ये बहुरंगी लढत असल्याने प्रत्येक उमेदवाराचे समर्थक मतदान करण्यास बाहेर पडले होते. यामुळे केंद्रावर पहिल्या टप्प्यात मतदान करण्यास मतदारांचा अमाप उत्साह दिसून आला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यत बहुतांश मतदान झाले होते.
सकाळच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया जलदगतीने
वॉर्ड क्रमांक 10 मधील पाटील गल्लीच्या मतदार केंद्रावर सकाळी 9 वाजेपर्यंत 873 पैकी फक्त 106 मतदान झाले होते. सकाळच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया जलदगतीने होत होती. वॉर्ड क्रमांक 16 मधील मतदारांची यादीत नावेच नसल्याने शास्त्रानगर परिसरातील मतदान केंद्रावर गोंधळ झाला. शास्त्राrनगर परिसरात मतदानाला चांगला प्रतिसाद होता. पण महाद्वार रोड मराठी शाळा क्रमांक 12 मध्ये तीन वॉर्डचे बुथ होते. मात्र याठिकाणी मतदारांचा थंडा प्रतिसाद होता. जुनी कपिलेश्वर कॉलनी, शहापूर चिंतामणी हायस्कूल, बसवाण गल्ली शहापूर, गाडे मार्ग अशा विविध ठिकाणी मतदारांची गर्दी दिसून आली.
शहापूर बसवाण गल्लीतील मतदान पेंदावर नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केल्याने बहुतांश मतदान झाले असल्याची माहिती समजली. जुनेबेळगाव वॉर्ड क्रमांक 56 च्या मराठी शाळा क्रमांक 33 मतदान केंद्रावर दुपारी एक वाजेपर्यंत फक्त 400 मतदान झाले होते.
वॉर्ड क्रमांक 27 मध्ये अटीतटीची लढत
काही पेंद्रांवर रांगेत उभे राहूनही मतदारयादीत नाव नसल्याचे सांगण्यात आल्याने मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. यामुळे नागरिक नाराजी व्यक्त करीत होते. वॉर्ड क्रमांक 27 मध्ये अटीतटीची लढत असून याठिकाणी मतदान पेंद्राबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती.
पोलिसांकडून अडवणूक
वडगाव परिसरात काही मतदान केंद्रावर टेबल लावण्यासाठी युवकांची गर्दी झाली होती. गर्दीला पांगविण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वापर करण्यात आला. वृद्ध नागरिक आणि अपंग नागरिकांना मतदान पेंदावर घेऊन जात असताना मतदारासोबत एकटय़ानेच जावे, असे सांगून काही पोलिसांनी अडवणूक केली. त्यामुळे मराठी भाषिकांना मतदान करण्यापासून वंचित रहावे लागले. अशाप्रकारची अडवणूक नेहमीच केली जात असते. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. वडगावमधील वॉर्ड क्रमांक 49 आणि 50 चे दहा मतदान बुथ असून दुपारी जेवणाच्या सुटीवेळी देखील यठिकाणी महिला मतदारांची गर्दी झाली होती. विविध मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर ठेवण्यात आली होती. पण वडगाव मराठी शाळा क्रमांक 31 मध्ये व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात आली नव्हती.
अनगोळ परिसरात मतदारांचा थंडा प्रतिसाद
टिळकवाडीतील बुधवार पेठ, गुरुवार पेठच्या वॉर्ड क्रमांक 29 चे मतदान केंद्र बालिका आदर्श मंदिर शाळेत होते. पण दुपारी साडेतीनच्या सुमारास मतदारांअभावी सदर पेंद्र ओस होते. अनगोळ परिसरातदेखील मतदारांचा थंडा प्रतिसाद होता. त्यामुळे वॉर्ड क्रमांक 43 आणि 52 च्या बुथमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत 35 टक्के मतदान झाले होते. दुपारी अनगोळ, टिळकवाडी, मराठा कॉलनी तसेच विविध भागातील मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी मतदार आले नसल्याने मतदान केंदे ओस पडली होती.









