उत्तर प्रदेशात सध्या पंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. भदोही जिल्हय़ातील सिंगपूर ग्रामसभा क्षेत्रातील मतदान सुरू असताना एक मजेशीर घटना घडली. या ग्रामसभेसाठी निवडणूक लढविणाऱया एका उमेदवाराला असा संशय आला की काही लोक महिलांच्या वेषात आणि घुंघट परिधान करून बनावट मतदान करीत आहेत. त्यामुळे त्याने प्रत्येक घुंघटधारी मतदाराचा घुंघट दूर करून चेहरा पाहण्याचा सपाटा लावला. त्यामुळे काही महिला मतदार संतप्त झाल्या.
काही महिलांनी थेट पोलीसात तक्रार केली. निवडणूक अधिकाऱयांच्या अनुमतीशिवाय हा उमेदवार घुंघट दूर करून महिलांचे ‘मुखदर्शन’ करीत असल्याचे पोलिसांना समजल्यावर त्यांनी या उमेदवाराला ताब्यात घेऊन थेट चौकीवर आणले. मात्र एवढे झाल्यानंतरही या उमेदवाराचा हेका कायम राहिला. आपल्या विरोधातील उमेदवार घुंघटधारी व्यक्तीकडून बनावट मतदान करून घेत आहेत, असा आरोप त्यांने पोलीस चौकीतही केला. पण पोलीसांवर त्याचा परिणाम झाला नाही. त्यांनी त्याला रीतसर अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.
वास्तविक मतदान करत असताना आपला चेहरा दाखविणे बंधनकारक असते. मतदान केंद्रात कोणत्याही मतदाराला तसे सांगण्यात येते. तथापि, उमेदवाराने योग्य कायदेशीर प्रक्रिया उपयोगात न आणता स्वतःच प्रत्येक महिलेचा घुंघट दूर करून तिचा चेहरा पाहणे हा गुन्हा ठरतो. आता या उमेदवारची परिसरात निंदा होत आहे. घुंघट उठवून पाहण्याची कृती त्याची अबू जाण्याचे कारण ठरली आहे.









