मुख्यमंत्र्यांची अधिकाऱयांना सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात अलीकडे पडलेल्या पावसामुळे सुमारे 5 लाख हेक्टरहून अधिक भागातील पिकांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे संपूर्ण घर कोसळलेल्यांना तातडीने 1 लाख रुपयांची मदत आणि अंशतः घर कोसळलेल्यांनाही मदत देण्याची सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली आहे. खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. पीकहानीची पाहणी केल्यानंतर अधिकाऱयांनी सॉफ्टवेअरवर माहिती नोंद केल्यानंतर शेतकऱयांना नुकसान भरपाई देण्याचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
येथे पत्रकारांशी ते बोलत होते. आजपासूनच पावसामुळे हानी झालेल्या भागाची युद्धपातळीवर पाहणी करून मदतकार्य हाती घेण्याची सूचना अधिकाऱयांना देण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या जारी असणाऱया एनडीआरएफ/एसडीआरएफ नियमाप्रमाणे संपूर्ण घर कोसळलेल्यांना 5 लाख रुपये, अंशतः घर कोसळल्यास 3 लाख रु. आणि घराची किरकोळ पडझड झाल्यास 50 हजार रुपये देण्यात येतील. मात्र पावसामुळे हानी झालेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी तातडीने 1 लाख रुपये मंजूर करण्याची सूचना अधिकाऱयांना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील जिल्हाधिकाऱयांच्या खात्यामध्ये 689 कोटी रुपये आहेत. आवश्यकता भासल्यास आणखी मदतनिधी मंजूर करण्याची सूचना अर्थखात्याच्या अधिकाऱयांना देण्यात आली आहे. राज्यात विधानपरिषद निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू आहे. तरीही पावसामुळे हानी झालेल्या भागांना भेटी देऊन पाहणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांना मुभा दिली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.









