ठाणे जिल्हय़ातील 5 जणांना अटक, राजापूर, सावर्डे, कणकवलीतील चोऱयांची कबुली
प्रतिनिधी/ राजापूर, रत्नागिरी
जिह्यात घरफोडय़ा करून पोबारा करणाऱया टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आह़े स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठाणे जिल्हय़ातून 5 संशयित घरफोडय़ा करणाऱयांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून घरफोडीसाठी वापरण्यात येणारे साहित्य व 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आह़े राजापुरातील श्रीराम गॅस एजन्सी, सावर्डे येथील स्वरा मोबाईल शॉपी व कणकवलीतील चोरीची कबुली त्यांनी दिली आहे. संशयितांना राजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले असून न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मोहम्मद इरफान कुद्दस खान (19, शिळफाटा, ठाणे), रिजवान अहमद मकबुल खान (27, रा. दिवा रोड, जि. ठाणे), मुमताज मेहराज शेख (20, रा. मुंब्रा रोड, ठाणे), एजाजअली सफातअली सिध्दीकी (25, रा. दहिसर, ठाणे) व मुस्ताक महारुख खान (34, रा. मुंब्रा, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़
राजापूर शहरातील साईनगर येथे मुंबई-गोवा महामार्गालगत मुबीन अब्दुल करीम मिठा व जगदीश दत्तात्रय कोळी यांची पार्टनरशिपमध्ये श्रीराम गॅस एजन्सी असून 6 जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटय़ांनी या एजन्सीवर डल्ला मारला होता. यामध्ये चोरटय़ांनी सुमारे 53 हजार 800 रूपयांची रोकड तसेच 9 हजार 100 रूपये किंमतीचे 9 मोबाईल डँडसेट व 7 हजार रूपये किंमतीचा एक लॅपटॉप असा सुमारे 69 हजार 900 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणी राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजापूर पोलीस व रत्नागिरी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग यांच्यामार्फत या प्रकरणाचा तपास सुरू होता.
तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील रोडवरील सावर्डे येथील स्वरा मोबाईल शॉपी येथून अज्ञात चोरटयांनी घरफोडी करुन पॉवरबॅक, कंपनीच्या बॅटऱया व इतर साहीत्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला होत़ा दोन्ही गुन्हे करण्याच्या पध्दती एकसारख्या असल्याने चोरटयांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील तपास पथकाकडून करण्यात येत होत़ा
चोरीला गेलेल्या एका मोबाईलच्या लोकेशनवरून व मिळालेल्या गुप्त माहितीवरून गुन्हा अन्वेषण विभागाने चोरटय़ांचा माग काढला. त्यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सासणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी चोरटय़ांचा तपास करत मुंब्रा येथे जावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. चोरटय़ांकडून मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम, लॅपटॉप, गुन्हात वापरलेली तवेरा फोर व्हिलर गाडी तसेच अन्य साहीत्य असा एकूण 4 लाख 13 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल़ा अटक करण्यात आलेल्या चोरटय़ांनी रत्नागिरी बरोबरच सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली येथे घरफोडी व चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपींना पुढील कार्यवाहीसाठी राजापूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. पाचही आरोपींविरूध्द भादवि कलम 454, 457 व 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूरचे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक एस. एम. वालावलकर करीत आहेत.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिरीष सासने, पोउनि, विकास चव्हाण, पोलीस हवालदार संजय कांबळे, संदीप कोळंबेकर, पोना विजय आंबेकर, नितीन डोमणे, अमोल भोसले, सागर साळवी, कॉन्स्टेबल दत्तात्रय कांबळे यांनी केल़ी









