प्रतिनिधी/कोल्हापूर
महापालिकेच्या घरफाळा विभागातील कर्मचाऱ्यांनी कोल्हापूर शहरातील अनेक मालमत्तांना चुकीच्या पद्धतीने मलईवर डोळा ठेवून घरफाळा आकारणी केली आहे. अनेक मालमत्तांचे क्षेत्रफळ कमी दाखवून कमी दराने घरफाळा आकारणी केली. भ्रष्ट कारभार करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान केल्याचे गंभीर आरोप करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. व्हीनस कॉर्नर येथील काही मालमत्तांची संयुक्त पाहणी करून या प्रकरणाचा पर्दाफाश शिवसेनेने केला. पुढील सोमवारपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल झाले नाही तर, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सेनेच्यावतीने देण्यात आला.
महानगरपालिकेच्या घरफाळा विभागामध्ये भ्रष्टाचार सुरू असल्याबाबत जिल्हा शिवसेनेच्यावतीने निवेदनाद्वारे ४५ दिवसापूर्वी आयुक्तांना कल्पना देण्यात आली होती. त्यावेळी प्रत्यक्ष भेटून काही पुरावे देखील सादर केले होते. परंतु हा प्रश्न महापालिका आयुक्त आणि प्रशासनाने गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे आज, शिवसेनेच्या व्यापक शिष्टमंडळाने महापालिकेचे करनिर्धारक संजय भोसले आणि लेखापरीक्षक धनंजय आंदळे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. गेल्या दिड महिन्यामध्ये घरफाळा आकारणीमध्ये दोषी असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर सायबर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल का केले नाहीत अशी विचारणा करीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
महापालिकेच्या उत्पन्न वाढीमध्ये काही घटकांपैकी घरफाळा विभाग हा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु या विभागामध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी हे सर्वसामान्य थकबाकीदारांना त्रास देतात. त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली जाते. प्रसंगी त्यांच्या मालमत्ता सिलबंद केल्या जातात. मात्र बड्या मिळकतदारांसोबत साटेलोटे करून मलईदार कामगिरी अंती त्यांच्याशी संगनमताने घरफाळा आकारणी होत आहे. घरफाळा विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या पैशावर दरोडा घातल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बैठकीदरम्यान केला.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत काही प्रॉपर्टी संयुक्तपणे पाहणी करण्याचा आग्रह धरला. व्हीनस कॉर्नर येथील मातोश्री प्लाझा मध्ये असलेल्या आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरकडे चौकशी केली असता भाडे लाखात असल्याचे सांगण्यात आले. तसेच मलबार गोल्ड या शोरूमचे भाडे कमी दाखवण्यात आले आहे यामुळे प्रत्यक्षात चुकीच्या पद्धतीने नोंदी व घरफाळा आकारणी केली असल्याचे उघड झाले. त्यामुळे तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली. मात्र चर्चेअंती पुढील सोमवार पर्यंत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मुदत देण्यात आली आहे. या कालावधीमध्ये संबंधित भ्रष्टाचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, महिला जिल्हा संघटक मेघा पेडणेकर, शुभांगी पोवार, प्रा. शिवाजीराव पाटील,अवधूत साळोखे, दिनेश परमार, राजू यादव, मंजीत माने, शशिकांत बिडकर, विनोद खोत,दिलीप जाधव, दिपाली शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.