प्रतिनिधी / बेळगाव
घरपट्टी भरण्यासाठी राज्य शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना मुदत देण्यात आली होती. मात्र कॅन्टोन्मेंटला ही मुदत वाढ मिळाली नाही. कोरोनामुळे आर्थिक आणि मानसिक अडचणीत सापडलेल्या मालमत्ताधारकांना घरपट्टी भरण्याची नोटीस कॅन्टोन्मेंट बोर्डाने बजावली आहे. 30 दिवसांत घरपट्टी भरा अन्यथा दंडासह रक्कम वसूल करू, असा इशारा देण्यात आला आहे. फेब्रुवारी ते जूनपर्यंत घरपट्टी भरण्यासाठी मुदत देण्यात येते. मात्र, याच दरम्यान लॉकडाऊन झाल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले होते. व्यवसाय बंद झाल्याने नागरिकांना घरपट्टी भरण्यास आर्थिक अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे अनेक मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा केली नाही. जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. मात्र पावसामुळे नागरिकांचे व्यवहार सुरळीत झाले नाहीत. सध्या सर्वच क्षेत्रात आर्थिक स्थिती बिकट झाल्याने नागरिकांनी घरपट्टी भरणा केली नाही. तसेच कॅन्टोन्मेंट बोर्डने घरपट्टीत वाढ केली आहे. कॅन्टोन्मेंट हद्दीतील अनेक मालमत्ताधारकांनी घरपट्टी भरणा केली नाही. मात्र घरपट्टी भरणा न केलेल्या मालमत्ताधारकांना कॅन्टोन्मेंट बोर्डने नोटीस बजावण्यास प्रारंभ केला आहे. 30 दिवसांच्या आत घरपट्टी भरण्याची सूचना केली असून घरपट्टी भरणा न केल्यास कॅन्टोन्मेंटच्या कायद्यानुसार दंड आकारणी करण्यात येईल. प्रतिमहिना 1 टक्के प्रमाणे घरपट्टीवर दंड वसूल केला जाईल, असा इशारा कॅन्टोन्मेंट बोर्डने नोटिसीद्वारे मालमत्ताधारकाला बजावला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या दडपणाखाली अडकलेल्या मालमत्ताधारकांना कॅन्टोन्मेंट बोर्डने घरपट्टी भरण्याची नोटीस बजावल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









