- पुणे जिल्ह्यात 36.35 लाखांवर ग्राहकांना ‘एसएमएस’ सेवा
ऑनलाईन टीम / पुणे :
जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरु असलेल्या घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर एकूण 36 लाख 35 हजार 824 ग्राहकांनी ग्राहक क्रमांकासोबत महावितरणकडे मोबाईल क्रमाकांची नोंदणी केली आहे. या सर्व ग्राहकांना मीटर रिंडींग, वीजबिलाचा तपशील, वीजपुरवठा खंडित करण्याची अधिकृत नोटीस तसेच वीजपुरवठ्याशी संबंधीत व इतर विविध माहितीचा तपशीलाची माहिती नियमितपणे ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे.
महावितरणकडून मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांना दरमहा वीजबिलांची रक्कम व इतर तपशील, वीजपुरवठा खंडित करण्याची अधिकृत नोटीस, मीटर रिडींग पाठविण्याचे आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या तसेच पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी आदींची माहिती ‘एसएमएस’द्वारे पाठविण्यात येत आहे. पुणे शहरातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी व इतर अशा 16 लाख 21 हजार 550 (93.06 टक्के) ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. तर पिंपरी चिंचवड शहरातील 6 लाख 80 हजार 960 (93.91 टक्के) ग्राहकांनी तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 13 लाख 33 हजार 314 (94.18 टक्के) मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.
सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील 2 लाख 47 हजार 283 वीजग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही. यामध्ये 2 लाख 37 हजार 227 अकृषक तसेच 10 हजार 56 कृषी ग्राहकांचा समावेश आहे. ज्या ग्राहकांनी अद्यापही ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली नाही त्यांना ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल ॲपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.