प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम झाली पाहिजे. ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी असलेल्या ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर असणे गरजेचे आहे. त्याकरता राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी जिल्ह्यावर कृपादृष्टी ठेवल्याने जिल्ह्यासाठी 14 डॉक्टर सोमवारी सेवेकरता रुजू होणार आहेत. त्यामुळे आता ग्रामीण भागातल्या रुग्णांना सेवा चांगली मिळणार आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयामार्फतच वैद्यकीय सेवा मिळते. मग जवळच्या मोठया गावातील उपकेंद्र असेल किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असेल. गेल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनामुळे आरोग्य विभागाकडे कटाक्षाने लक्ष दिले जात आहेच. त्यातच आरोग्य उपसंचालक डॉ. संजोग कदम हे साताऱ्याचे असल्याने प्राधान्याने लक्ष देतात. आताही त्यांनी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांना डॉक्टर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केला. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी नव्याने एमबीबीएस डॉक्टर घेतले असून, 14 डॉक्टर हे सोमवारी हजर होत आहेत. त्यामध्ये ग्रामीण रुग्णालय मेढा येथे दोन, सोमर्डी येथे 1 कोरेगाव, वडूज, दहिवडी, औंध, पाटण, पिंपोडे प्राथमिक आरोग्य केंद्र, लोणंद, तरडगाव, इंदोली, पुसेसावळी यांचा समावेश आहे. तसेच पुढच्या आठवडय़ात स्पेशलिस्ट डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहेत.