अंत्यविधीनंतर उपलब्ध होत आहे कोरोनाबाधितांचा अहवाल
प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीमदेखील थंडावली आहे. तसेच मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीनंतर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल येत असल्याने नागरिकांची धास्ती वाढत आहे. ग्रामीण भागात सध्या कोणत्याच उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने नागरिकांचे आरोग्य रामभरोसे आहे.
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा आलेख वाढत चालला आहे. कोरोनाबाधितांचा अहवाल आल्यानंतर घर सिलडाऊन करणे, सॅनिटायझर करणे, घरातील अन्य व्यक्तींची आरोग्य चाचणी करणे तसेच ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्दी, ताप, खोकला असा आजार असलेल्या नागरिकांची माहिती घेणे, अशी मोहीम ग्राम पंचायत आणि आशा कार्यकर्त्यांच्यावतीने राबविण्यात येत होती. पण ही मोहीम पूर्णपणे थंडावली असून कोरोनाबाधितांकडून कोरोनाचा प्रसार होऊ नये, यादृष्टीने कोणत्याच उपाययोजना राबविण्यात येत नाहीत.
घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याची मोहीम बंद झाल्याने सर्दी, ताप, खोकला, अशा आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. वातावरणातील बदलामुळे आजार आला असल्याचे समजून नागरिक घरीच रहात आहेत. तसेच ग्रामीण भागात खासगी दवाखान्यांमध्ये औषधोपचारदेखील करण्यात येत नसल्याने नागरिक घरी थांबत आहेत. मात्र, कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांचा आजार बळावून श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. रुग्णाची स्थिती गंभीर झाल्यानंतर दवाखान्यात दाखल करण्यात येत आहे. काही रुग्ण दगावत आहेत. मृत्यू झालेल्या नागरिकांची कोरोना चाचणी आल्यानंतरच अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येत होती. पण ग्रामीण भागात मृत्यू झालेल्या व्यक्तिचा अंत्यविधी झाल्यानंतर कोरोना चाचणीचा अहवाल उपलब्ध होत आहे.
आवश्यक नियमावलींची अंमलबजावणी करणे गरजेचे
अंत्यविधी करताना आवश्यक खबरदारी घेण्यात येत नसल्याने कोरोनाची लागण होण्याचा धोका वाढला आहे. कोरोनाबाधित व्यक्तीच्या अंत्यविधीस गेलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची धास्ती वाढली आहे. अंत्यविधीसाठी ग्राम पंचायतकडून व आरोग्य विभागाकडून आवश्यक नियमावलींची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून किरकोळ आजार असलेल्या नागरिकांना आरोग्य खात्याच्यावतीने औषधे उपलब्ध करणे गरजेचे आहे. पण याकडे प्रशासनाचे व ग्रा. पं. आणि आरोग्य खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य रामभरोसे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.









