वकील-पीडित विवाहितेच्या कुटुंबीयांची जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार
प्रतिनिधी / बेळगाव
हुंचेनट्टी येथील एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार करून तिला मानसिक त्रास दिला आहे. सदर महिला दलित असल्यामुळे हे प्रकरण बेळगाव ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी यांच्याकडे सोपविण्यात आले होते. मात्र, त्यांनी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. आरोपी आणि पीडित महिलेलाही घटनास्थळी नेऊन पंचनामा करण्याचा प्रयत्न केला, हे अत्यंत चुकीचे आहे. तेव्हा सदर एसीपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी वकिलांनी आणि पीडित विवाहितेच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
या गरीब कुटुंबाचा गैरफायदा संशयित आरोपी योगेश रानोबा गुरव याने घेतला. त्याने या कुटुंबाशी मैत्री केली. त्यानंतर त्या महिलेवर लैंगिक अत्याचार केले. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ामध्ये त्या महिलेचे अपहरणदेखील केले. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीणचे एसीपी गणपती गुडाजी यांच्याकडे तपासकार्य सोपविण्यात आले.
त्यांनी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. ही गंभीर बाब असताना या दलित आणि गरीब कुटुंबावर दबाव घालण्याचा प्रयत्न एसीपींनी केला आहे. पंचनामा करण्यासाठी संशयित आरोपीला आणि पीडित विवाहितेलाही घटनास्थळी नेले. त्या ठिकाणी छायाचित्रे काढली. वास्तविक केवळ संशयित आरोपीलाच त्या ठिकाणी नेणे गरजेचे होते. मात्र, पीडित महिलेलाही त्या ठिकाणी नेले. हे कायद्याच्या विरोधात आहे. तेव्हा एसीपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ऍड. प्रवीण करोशी, ऍड. विश्वनाथ तळवार, ऍड. दत्ता नडुगेरी, ऍड. परशुराम तारिहाळ, ऍड. संजू जाई, ऍड. महांतेश लक्कुंडी, ऍड. संपत शिंत्रे यांच्यासह वकील उपस्थित
होते.









