जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांची माहिती
कृष्णात चौगले/कोल्हापूर
भुदरगड तालुक्यातील आकुर्डी येथील चालक मुंबईतील गर्भवतीला सोडून गावात आल्यानंतर ग्राम समितीने त्याचे सक्तीने प्राथमिक शाळेमध्ये इन्स्टीटय़ुशनल क्वॉरंटाईन केले. त्यानंतर दहा दिवसातच त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. ग्रामसमितीने घेतलेल्या खंबीर निर्णयामुळेच आकुर्डी गावामध्ये कोरोनाचा संसर्ग टळला. अशा पद्धतीने जिह्यातील सर्वच ग्रामसमित्यांनी ठोसपणे निर्णय घेण्याची गरज आहे. तरच जिह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लवकरच यश मिळेल, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.
डॉ. साळे म्हणाले, ‘गाव करील ते राव करील काय ?’ ही म्हण प्रचलित आहे. एखादा निर्णय घ्यायचा आणि तो कोणत्याही परिस्थितीत तडीस लावायाचा यासाठी ग्रामस्थ नेहमी आग्रही असतात. मग त्यासाठी प्रशासनाच्या मदतीची प्रतिक्षादेखील ते करत नाहीत. त्यामुळे आजही गावगाडा सक्षमपणे सुरु असून प्रशासकीय निर्णय राबविण्यासाठी त्याचा मोठा फायदा होत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या आवाहनानुसार जिह्यात ग्रामसमित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांकडून कौतुकास्पद काम सुरु आहे. अनेक गावच्या वेशीवर ग्रामपंचायतींनी स्वखर्चाने होमगार्डची नियुक्ती केली असून बाहेर गावाहून येणाऱया नागरिकांची कसून चौकशी करून मगच गावात प्रवेश दिला जात आहे. तर काही गावातील युवकांनी स्वयंस्फुर्तीने गावच्या संरक्षणाचा विडा उचलला असून ते वेशीवर ठाण मांडून आहेत. त्यामुळे गावात कोणी नवीन पाहुणा आला आहे काय ? कोणी गावातील व्यक्ती परजिह्यातून पुन्हा गावात परतली आहे काय ? याची यादी ग्रामपंचायतींकडे तयार आहे. त्यामुळे कोरोनाबाधित क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीस ग्रामसमितीकडून इन्स्टीटय़ुशनल क्वॉरंटाइन केले जात आहे. अपवादात्मक परिस्थितीत काही गावांमध्ये ‘तो माझ्या जवळचा आहे’ असे सांगून गावपुढाऱयांकडून परजिह्यातून आलेल्यांना थेट गावात प्रवेश दिला जात आहे. हे गावासाठी आणि जिह्यासाठी धोकादायक आहे. आकुर्डी गावातील ग्रामस्थांनी चालकास क्वॉरंटाइन करण्याबाबत निर्णय घेतला नसता तर आज अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला असता. त्याला क्वॉरंटाइन केल्यामुळे एकही व्यक्ती त्याच्या संपर्कात आली नाही आणि तेथेच संसर्गाची साखळी तुटली. अशा प्रकारे जिह्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी ठोसपणे निर्णय घ्यावेत. तरच जिल्हा लवकर कोरोनामुक्त होईल.
लॉकडाऊनमधील शिथिलतेमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका
शासनाने 4 मे पासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली. पण या शिथिलतेचा चुकीचा अर्थ काढून नागरिक मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत. परिणामी बाजारपेठेसह अनेक ठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून आणखी आठ ते दहा दिवसानंतर जिह्यात पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच नेहमी मास्कचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे मत डॉ. साळे यांनी व्यक्त केले.
कोणाच्या संपर्कात नसतानाही इचलकरंजीतील तिसरी व्यक्ती पॉझिटीव्ह
इचलकरंजीमध्ये सापडलेला तिसरा कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती लॉकडाऊनपासून घरातच थांबला होता. तो कोणत्याही कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेला नाही. तरीही त्याला कोरोनाचा संसर्ग कसा झाला ? याबाबत आरोग्य विभाग सर्व्हे करत आहे. ती व्यक्ती घराबाहेर पडली नसली तरीही लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधिताच्या संपर्कात निश्चितपणे आली असणार असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरातील संबंधित परिसर पूर्णपणे लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. तेथील नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षीत असल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले.