तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील 590 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसह, प्रस्थापितांना धक्का बसला. पंढरपूर, माळशिरस, बार्शी, दक्षिण सोलापुरात भाजप, अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस, माढा राष्ट्रवादी, उत्तर सोलापुरात शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले तर सांगोला तालुक्यात दीपकआबा, शेकाप गटाचे वर्चस्व दिसून आले. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व दिसून आले.
दक्षिण सोलापूरमध्ये माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गड राखला तर पंढरपूर गटात पुन्हा परिचारक गटाला संधी देण्यात आली आहे. बार्शी तालुक्यात आ. राजेंद्र राऊत यांचे पॅनल आहे. मोहोळ तालुक्यात राजन पाटील यांनी बाजी मारली आहे. माळशिरस, अकलूज तालुक्यात मोहिते-पाटील यांनी आपला गड राखला. मात्र, विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह यांचा धक्कादायक पराभव झाला. दरम्यान, विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून, हलगी आणि घोषणाबाजी करीत एकच जल्लोष केला.
जिह्यातील 590 ग्रामपंचायतीसाठी मोठÎा चुरशीने मतदान झाले असून 80 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, आज सोमवारी प्रत्येक तालुक्यात मतमोजणी पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ झाले. प्रारंभी पोस्टलची मतमोजणी झाली. त्यानंतर हळुहळू मुख्य ग्रामपंचायतीच्या मतमोजणीचे चित्र स्पष्ट होऊ लागले. तालुक्यातील सर्वच मतमोजणी कार्यालयाबाहेर कार्यकर्ते, उमेदवारांची एकच गर्दी दिसून आली.
दक्षिण सोलापुरातील 54 ग्रामपंचायतीपैकी 8 बिनविरोध झाल्या. तर उर्वरित मतमोजणीत भाजपची सत्ता आली. सुभाष देशमुख यांच्या गटाचे पॅनल निवडून आले. यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय चिदानंद सुरवसे, माजी आमदार दिलीप माने यांचे निकटवर्तीय प्रमोद शिंदे यांचा पराभव झाला. तर माजी मंत्री कै. आनंदराव देवकते यांचे नातू सतिश देवकते निवडून आले असून पूर्ण पॅनल निवडून आले. मोहोळ तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींपैकी 71 ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे राजन पाटील गटाचे वर्चस्व निर्माण झाले. पंढरपूर तालुक्यात 72 पैकी 1 बिनविरोध उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक आणि भालके गटाचे वर्चस्व दिसून आले.
माळशिरस तालुक्यात विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटाचे वर्चस्व असून 44 हून अधिक ग्रामपंचायतीत उमेदवार विजयी झाले. मात्र, अकलूज ग्रामपंचायतीत मोहिते-पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह यांचा धक्कादायक पराभव झाला. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे 3 ग्रामपंचायतीवर झेंडा रोवला. सांगोला तालुक्यात 61 ग्रापपंचायतपैकी 5 बिनविरोध तर 56 पैकी 30 हून अधिक शेकापच्या पॅनल आले. उत्तर सोलापुरात शिवेसना, माढÎात राष्ट्रवादीच्या गटाचे वर्चस्व दिसून आले. बार्शी तालुक्यात 80 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक आमदार राजेंद्र राऊत गटाचे पॅनल विजयी झाले. अक्कलकोट तालुक्यात भाजप, काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. माढा तालुक्यात एकहाती वर्चस्व राखण्यात अण्णा ढाणे गटाला यश आले असून याठिकाणी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचा दारुण पराभव झला. मंगळवेढÎात ग्रामपंचायतीवर आवताडे गटाचा झेंडा आला असून 12 ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवलेली आहे.
निकाल ठळक घडामोडी
– दक्षिण सोलापुरात पुन्हा भाजपचीच मुसंडी 17 पैकी 13 जागेवर वर्चस्व,
काँग्रेसच्या अप्पासाहेब बिराजदार यांचा पराभव
– होटगीत भाजप तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी पॅनला 10 जागा
सांगोला तालुक्यात दीपकआबा गटास 11 जागा तर भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख गटाचा पराभव 4 जागा मिळाल्या
– माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटील गटाची सरशी
मोहोळ तालुक्यात राजन पाटील गटाचे वर्चस्व, नरखेडमध्ये उमेश पाटील यांनी केले विरोधकांचे डिपॉझिट जप्त, भैरववाडी व मनगोळी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये सासू दोन वेळा बिनविरोध निवड तर सून निवडणुकीत विजयी
– अक्कलकोट तालुक्यात माजी आमदार सिध्दराम म्हेत्रे गटाचे वर्चस्व, कल्याणशेट्टी गटाचा पराभव
– मंगळवेढ्यात आवताडे गटाची सत्ता भालके गटाचा पराभव, स्वाभिमानीची एन्ट्री, स्थानिक स्वराज्य संस्थेतील नेत्यांचे वर्चस्व
– माढा तालुक्यात अखिल भारतीय संरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांचा पराभव, अण्णा ढाणे गटाचे वर्चस्व
– करमाळा तालुक्यात भाजपला 19 जागेवर यश,
– पंढरपूर तालुक्यात 3 जागा चिठ्ठ्या टाकून केल्या निवडी
– वाडीकुरोली येथे महिला राज
गुलाल अन् हलगीच्या कडकडाट्यात जल्लोष
590 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून यानिवडणुकीत निवडून आलेल्या पॅनल, पक्षांनी गुलाल उधळून केला जल्लोष. विजयी उमेदवारांना हार घालून व घोषणाबाजीने तालुक्यातील मतमोजणी ठिकाण परिसरातील दणाणून गेले होते.
अक्कलकोटमध्ये रिपाइं आठवले गटाचा दबदबा
अक्कलकोट तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पडली असून यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपाइं आठवले गटाने वर्चस्व प्रस्थापित केल्याचा दावा अविनाश मंडिखांबे यांनी केला.