राज्य सरकारचा निर्णय : 5960 ग्रा. पं. च्या 60 हजार कर्मचाऱयांची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील 60 हजार ग्रा. पं. कर्मचाऱयांचे वेतन यापुढे ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्मचाऱयांच्या थेट बँक खात्यामध्ये वेतनाची रक्कम जमा केली जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपूर्वी बँक खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. यासाठी इलेक्ट्रॉनिक फंड मॅनेजमेंट सिस्टीम ही नवी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
ग्रामीण विकास व पंचायत राजचे मुख्य सचिव एल. के. लतीक यांनी सर्व जिल्हा पंचायतच्या सीईओंना ग्रामपंचायत कर्मचाऱयांचा पगार ऑनलाईन करण्याचे आदेश दिले आहेत. चिक्कबळ्ळापूर येथील ग्रामपंचायतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर नव्या प्रणालीचा वापर करून ऑनलाईन वेतन करण्यात आले आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यामुळे राज्यातील 5,960 ग्राम पंचायतींमध्ये ही प्रणाली विकसित केली जाणार आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱयांच्या वेतनासाठी वर्षाकाठी 900 कोटी रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे ही सर्व रक्कम यापुढे ऑनलाईन स्वरुपात दिली जाणार आहे.
सध्या ग्रा. पं. कर्मचाऱयांना धनादेशाद्वारे वेतन दिले जात आहे. दिलेले धनादेश वटविण्यासाठी बँकांमध्ये जाणे, त्यानंतर तो वटण्यासाठी लागणारा कालावधी यामध्ये बराच वेळ वाया जात होता. त्यामुळे खात्यामध्ये रक्कम जमा करावी, अशी मागणी ग्रा. पं. कर्मचाऱयांकडून केली जात होती. नव्या प्रणालीनुसार आधार क्रमांकाशी सलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे. यामुळे होणाऱया गैरव्यवहारांनाही आळा बसण्यास मदत होणार आहे.
जिल्हा पंचायत व तालुका पंचायत कर्मचाऱयांना सरकारी वेतन असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते. परंतु ग्रामपंचायतच्या कर्मचाऱयांना धनादेशाद्वारे वेतन देण्यात येत असल्याने त्यांना अनेक समस्या येत होत्या. आरडीपीआर विभागाने ग्रामपंचायतींना त्यांचे कर्मचारी आणि त्यांच्या बँक खात्याची माहिती देण्यास दहा फेब्रुवारीपर्यंत अंतिम तारीख देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतींना कर्मचाऱयांच्या वेतनासाठी स्वतंत्र खाते सुरू करण्यासही विचारणा केल्याचे लतीक यांनी सांगितले.









