प्रत्येक दिवस काही वेगळेपण घेऊन उगवत असतो आणि प्रत्येक दिवसाचे म्हणून एक महत्त्व असते. काल रविवारचा दिवस अनेक अर्थांनी वेगळा होता. सर्वात मोठा दिवस, योग दिवस, फादर्स डे आणि ज्येष्ठ महिन्यातील शेवटचा दिवस. अशा अनेक प्रभा या दिवसाला होत्या आणि या दशकातले डायमंड रिंग अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहण हा निसर्गाचा नजारा बघायला मिळाला. अनेक अर्थांनी हा दिवस महत्त्वपूर्ण होता. पण ही मजा घ्यावी असे वातावरण नाही, मोकळीक नाही अवघे विश्व कोरोना विषाणूच्या श्वास दाबून टाकणाऱया विषारी पंजात अडकले आहे. चीनचा हा विषाणू जसा त्रास देतो आहे तसा चीनही. आणि भारताचे शेजारी नेपाळ व पाकिस्तानही कुरघोडय़ा करत आहेत. त्यामुळे अवघी मनस्थिती ठीक नाही. आता हे संकटाचे, महामारीचे ग्रहण सुटले पाहिजे. खरेतर हे दिवस पेरण्या पूर्ण करून ज्ञानोबा, तुकोबा, रामकृष्ण हरिचा गजर करत पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी संतांच्या पालख्या मिरवत जाण्याचे. सारे भेदाभेद अमंगळ म्हणत व चिंता दूर करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी धावत जाण्याचे, समतेचा, समरसतेची भगवी पताका उंचावण्याचे आणि चित्त शुद्ध करून आचरणांचे नियम घालून घेण्याचे. हाच काळ आषाढाचा कवी कालिदासांचे व त्यांच्या काव्याचे स्मरण करण्याचा. कवीची भरारी आणि काव्याची शक्ती मेघदूतातून जाणवते. मेघदूताचे अनेकांनी अनुवाद केले आहेत. ना. ग. गोरेंपासून कुसुमाग्रजांपर्यंत आणि आजच्या अनेक युवक कवींपर्यंत सर्वांना मेघदूताने मोहिनी घातली आहे. कुसुमाग्रजांनी तर लिहून ठेवले आहे, परमेश्वराने मला मरणानंतर एकच गोष्ट सोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली तर मी सोबत पुस्तक नेईन आणि ते असेल मेघदूत. यातच ‘आषाढस्य प्रथम दिवसे’चे महत्त्व, प्रभाव अधोरेखित होतो. पण, यंदा घरातून वारी, डिजिटल योगदिन आणि ग्रहणाचा आनंदही घरातूनच अशी वेळ आली आहे. घरात कोंडले गेलेले हे ग्रहण केव्हा सुटणार हा सर्वांनाच प्रश्न आहे. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण हे माणसाला नेहमीच मोहवत आले आहे. ग्रहणाचे अनेक अर्थ अनेक मंडळी लावत असतात. या अर्थामागे श्रद्धा, अंधश्रद्धा असतात, पिढय़ा न् पिढय़ा, वर्षानुवर्षे त्या सुरू आहेत. माणूस चंद्रावर जाऊन आला आणि त्यांची मंगळ मोहीम सुरू आहे पण विश्वाची निर्मिती, ग्रह-तारे-ग्रहण यांचे आकर्षण, त्याबद्दलच्या खऱया खोटय़ा गोष्टी श्रद्धा, अंधश्रद्धा व अफवा हा सिलसिला सुरूच आहे. आणि तो कितीही जागृती झाली तर थांबेल किंवा थांबवला जाईल असे वाटत नाही. गेले काही दिवस बंद पडलेल्या कुठल्यातरी विदेशी पंचांगाचा आधार घेऊन रविवारी जगबुडी होणार, प्रलय होणार, कलियुग संपणार व सत्ययुग अवतरणार, मानव जात नष्ट होणार असे काही मंडळी दावे करताना दिसत होते. पण, हे दावे साफ खोटे ठरले आहेत. वैज्ञानिकांनी अनेक वर्षे ग्रहणकाळात ग्रहणे, निसर्ग ग्रहस्थिती यांचे अभ्यास व निरीक्षणे केली आहेत त्यातून संशोधन झाले आहे, होते आहे. खरे तर असे ग्रहण ही अभ्यासकांना पर्वणी असते. हा सावल्यांचा खेळ आहे. पण माणसे आपल्या श्रद्धा, अंधश्रद्धा, परंपरा पाळून त्यांचा आनंद घेत असतात. आज देशभर ढगाळ वातावरण असूनही सूर्यग्रहणाचा अभ्यास, निरीक्षण अनेकांनी केले. सूर्य झाकोळला असताना त्याच्या मागे आणखी काही ग्रह, तारे, सूर्यमाला दिसतात का यांचे संशोधन सुरू आहे. माणूस अवकाशाला गवसणी घालतो आहे. पण दुसरीकडे कोरोनामुळे घाईला आला आहे. प्रतिकारशक्ती वाढली पाहिजे. शरीर लवचिक व तंदुरूस्त असले पाहिजे यासाठी योग, व्यायाम आणि आयुर्वेद यांची भारतीय ऋषींनी माणसाला देणगी दिली आहे. 21 जून हा सर्वात मोठा दिवस असतो आणि सूर्याचा दक्षिणेकडे प्रवास सुरू होतो. हळूहळू दिवस लहान होत जातो. रथसप्तमीनंतरचा प्रवास पुन्हा हळूहळू पूर्वपदावर येतो. ओघाने हा सर्वात मोठा दिवस आणि तोच दिवस योगदिन म्हणून साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः योगासने, प्राणायाम करतात आणि नव्या पिढीने योगासने केली पाहिजेत. क्रीडांगणावर घाम गाळला पाहिजे अशी भूमिका घेत त्यांनी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायला सुरूवात केली. आज अनेक भारतीय योग शिक्षक जगभर योगशिक्षणाचे धडे देत आहेत आणि या कोरोना महामारीत प्रतिकारशक्ती वाढवण्यास आयुर्वेद, योग आणि योगासने, प्राणायाम महत्त्वपूर्ण ठरत आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टींना बंधने आली आहेत. घरातच रहा, सुरक्षित रहा, स्वच्छता पाळा, हात धुवा, गर्दी करू नका, अंतर राखा वगैरे गोष्टी जीवनशैली ठरू लागल्या आहेत. शाळा, शिक्षण, छंद, व्यापार, उद्योग, नोकरी, अर्थव्यवस्था, प्रवास, पर्यटन, खाद्यउद्योग अनेक गोष्टी संकटात आहेत. माणसांना निराशेने ग्रासले आहे. नोकरदारांना पुढचा पगार मिळणार का याची शाश्वती उरलेली नाही. हातावरचे पोट अडचणीत आहे. कलाकार मंडळी चिंतीत आहेत. अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. महानगरातून गावात आलेल्या मंडळींना जगवण्यासाठी योजना जाहीर होत आहेत, पण मोठे संकट उभे राहिले आहे. अशावेळी प्रत्येकांची कसोटी आहे. सूर्यग्रहणामुळे कोरोना नष्ट होतो का, ग्रहणामुळे जग नष्ट होते या गोष्टींना फार महत्त्व न देता या संकटकाळात अवघ्या भारतवर्षाचे कल्याण होईल, कुणीही उपाशी राहणार नाही आणि नियम, कायदे पाळून आपण एकमेकांना मदत करू. हे दिवसही जातील. भारतीय जवान देशांच्या सीमा राखण्यास समर्थ आहेत. भारताने पाकिस्तानेचे कंबरडे मोडले आहे. आता नेपाळ व चीनला खुमखुमी आली आहे. भारत हा शांतताप्रिय देश आहे, पण कुणाचेही काही वावगे सहन करणारा नाही. कुणालाही अद्दल घडवण्याची शक्ती बाळगून आहे. कोरोनासह हे ग्रहणही सुटेल आणि स्वच्छ उजाडेल, आनंदाची उबदार किरणे सर्वांना आधार देतील, तूर्त संयम पाळून कोरोनाला हरवूया.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








