संशयित आरोपी मुरलीच्या चौकशीतून माहिती उघड
प्रतिनिधी/ बेंगळूर
पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणी बेंगळूरच्या एसआयटी पथकाने गुरुवारी सायंकाळी झारखंड येथून ऋषिकेश देवडीकर उर्फ मुरली (वय 44) याला अटक केली होती. त्याची कसून चौकशी करण्यात येत असून त्याने दिलेल्या माहितीवेळी धक्कादायक बाब सामोरे आली आहे.
गौरी यांचे मारेकरी सांकेतिक भाषेत संवाद साधत होते. मुरली याचा गौरी लंकेश हत्येबरोबरच पुरोगामी विचारवंत, साहित्यिक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप आहे. गौरी यांच्या हत्येचा कट रचताना ते ‘अम्म’ (आई) असा उल्लेख करत होते. गौरी यांची हत्या होईपर्यंत मोबाईलवर संभाषण करताना याच शब्दाचा उल्लेख करण्यात येत होता. कटात सहभागी असणाऱया सर्वजण ‘ऑपरेशन अम्म’ या सांकेतिक नावाचाच वापर करत होते, अशी माहिती मुरली याने चौकशीवेळी दिली आहे.
नवीनकुमारची जमीन याचिका फेटाळली
गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी के. टी. नवीनकुमार याने दाखल केलेली जामीन याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने एकसदस्यिय खंडपीठाने फेटाळली आहे. 16 फेब्रुवारी 2018 रोजी बेंगळूरच्या मॅजेस्टीक बसस्थानकावरून नवीनकुमारला ताब्यात घेण्यात आले होते. त्यावेळी त्याच्याजवळून गावठी पिस्तूल, 5 काडतुसे जप्त करण्यात आली होती. गौरी हत्येत त्याचाही सहभाग असावा, या संशयाने एसआयटीने त्याला आपल्या ताब्यात घेतले होते.









