प्रतिनिधी / सातारा :
गौराई आणि घरगुती गणपती गेले सहा दिवस कोरोनाच्या काळात ही उत्साही वातावरणात आले होते. प्रत्येक गणेश भक्तांच्या घरात सुख, शांती, भरभराट होऊ दे असा आशीर्वाद देत लाडके बाप्पा सहाव्या दिवशी त्यांच्या गावी चालले. सातारा शहरात पालिकेच्यावतीने विसर्जन तळ्यात सोय केली होती. निर्माल्यासाठी कुंड ठेवले होते तर पालिकेच्या टीम कार्यरत होत्या. ध्रम्यान, ग्रामीण गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या घरातल्या बाप्पांना भक्तिभावाने निरोप दिला.
’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, कोरोनाला घेऊन जा’, ’एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार’ अशा घोषणा देत गणेश भक्तांनी भावपूर्ण निरोप आपल्या लाडक्या बाप्पाना दिला. सकाळी गौराईच्या समोर घरातील महिलांनी दोरे घेण्याचा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम उरकल्यावर दुपारी बारा वाजल्यापासून शहरात गणपती आणि गणेश विसर्जनाची सुरुवात झाली.
वाहनातून केवळ दोन व्यक्ती आपल्या लाडक्या बाप्पाना आणि गौराईना घेऊन पालिकेच्या कृत्रिम तळ्यात विसर्जन करण्यात येत होते. मंगळवार तळे आणि फुटके तळे परिसरात हौद ठेवण्यात आले होते. निर्माल्यासाठी कुंड ठेवले होते. पालिकेच्यावतीने हुतात्मा स्मारक, अण्णासाहेब कल्याणी शाळेसमोरील तळे, सदरबझार येथील दगडी शाळेच्या परिसरातील तळे येथे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिला बाप्पांना निरोप
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरच्या गणपतीचे आज विधिवत पूजन करून घरात आरती करून पालिकेच्या हुतात्मा स्मारकालगत असलेल्या तळ्यात विसर्जन करण्यात आले. यावेळी यशराज देसाई यांच्यासह कुटूंबिय उपस्थित होते. जगावरील कोरोनाचे संकट लवकर टळू दे, अशी प्रार्थना मंत्री शंभुराज देसाईंनी करत बाप्पांना निरोप दिला.









