इस्तंबुलमधील मुष्टियुद्ध स्पर्धेत सोनिया लाथेरचीही आगेकूच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण मिळविलेल्या भारताच्या गौरव सोळंकीने तुर्कीतील इस्तंबुल येथे सुरू असलेल्या बॉस्फोरस मुष्टियुद्ध स्पर्धेत 57 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे.
सोळंकीने या लढतीत सुरुवातीपासूनच कझाकच्या अरापोव्ह ऐदोसवर वर्चस्व ठेवत 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या सोनिया लाथेरनेही विजयी सुरुवात केली आहे. तिने महिलांच्या 57 किलो वजन गटाच्या लढतीत अर्जेन्टिनाच्या रोजोरिओ मिलोग्रॉसवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. तिची पुढील लढत स्थानिक सुर्मेनेली टग्सेनाझविरुद्ध होणार आहे.
दरम्यान, भारताच्या तीन अन्य मुष्टियोद्धय़ांना पहिल्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांच्या 91 किलो वजन गटात भारताच्या नमन तन्वरला तुर्कीच्या बाकी याल्सिन मुहम्मदकडून 4-1 असा पराभव स्वीकारावा लागला तर पीएल प्रसादला 52 किलो गटाच्या लढतीत कझाकच्या अब्दिकादीर दामिरने 5-0 असे नमविले. प्रयाग चव्हाण (पुरुष 75 किलो गट), पूजा (महिला 75 किलो गट) यांनाही अनुक्रमे अझरबैजानचा साहसुवरली करमन व रशियाची शमोनोव्हा ऍनास्तेसिया यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
या स्पर्धेच्या दुसऱया दिवशी सहा भारतीय खेळाडू रिंगणात उतरणार असून शिवा थापा (63 किलो), दुर्योधन नेगी (69 किलो), ब्रिजेश यादव (81 किलो) किशन शर्मा (91 किलोवरील गट) यांच्या पुरुष विभागातील तर निखत झरीन (51 किलो गट), परवीन (60 किलो) यांच्या महिला गटातील लढती होणार आहेत.
भारताने 13 सदस्यीय पथक या स्पर्धेसाठी पाठविले असून त्यात आठ पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. 21 मार्चपर्यंत ही स्पर्धा होणार असून त्यात रशिया, अर्जेन्टिना, कझाकस्तान येथील अव्वल मुष्टियोद्धय़ांनी भाग घेतला आहे.









