प्रतिनिधी / बेळगाव
गौंडवाड येथील देवस्थानची जमीन परस्पर विक्री करण्यात आली आहे. तर सध्या असलेली जमीनही विकण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरी ती सर्व जमीन देवस्थान ट्रस्टच्या नावे करून ग्रामस्थांच्या ताब्यात द्यावी अशी मागणी गौंडवाड येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गौंडवाड येथील श्री कलमेश्वर, काळभैरव, लक्ष्मी देवी देवस्थान यांची एक एकर सव्वीस गुंठे, एक एकर, एक एकर सत्तावीस गुंठे आणि एक एकर अशी जमीन आहे. ती सर्व जमीन देवस्थानची आहे. जवळपास साडेचार एकरहून अधिक जमीन असून ती जमीन पूर्वीपासूनच देवस्थानची आहे. मात्र त्यावरील नावे कमी करून गावातील दोघांनी त्या जमिनीवर आपली नावे दाखल केली आहेत. त्यामधील एक एकरहून अधिक जमिनीमध्ये प्लॉट टाकून ती परस्पर विक्री केली आहे.
देवस्थानची जमीन असताना ती विक्री केली गेली आहे. तेव्हा त्यांची नावे कमी करून देवस्थान ट्रस्टची नावे त्या जमिनीवर दाखल करावीत अशी मागणी करण्यात आली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अनिल पाटील, सतिश पाटील, मोहन नाथबुवा, राजू पाटील, मनोहर सुतार, बाबुराव पाटील, जयाप्पा पवार, बसवंत पाटील, मुरलीधर पाटील, सुमन जठार, नारायण पवार, राजू पवार, प्रसाद बडवाण्णाचे, अप्पाजी सुळेभाविकर, हरी रामा चौगुले, यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









