प्रतिनिधी/कोकरूड
गोव्याहून चित्तोडगड (राजस्थान) कडे माघारी निघालेली बस मेनी फाटा ता. शिराळा येथील पुलावरून ओढ्याच्या पात्रात कोसळून झालेल्या अपघातात 7 प्रवाशी जखमी झाले असून त्यांना कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची नोंद कोकरूड पोलिसांत करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चित्तोडगड (राजस्थान) येथील कालोजी छुपा यांच्या ” कालोजी हलवाई केटरिंग ” कंपनीला गोव्यामधील एका लग्न समारंभाची मिठाई बनवण्याची ऑर्डर मिळाली होती.यासाठी ही केटरिंग टीम बस क्रमांक आर. जे. 09 पी. ए. 4147 मधून 3 डिसेंबर रोजी चितोडगडहून गोव्यास रवाना झाली होती. 6 आणि 7 डिसेंबर रोजी विवाह सोहळा संपन्न झाल्यावर, बुधवारी 8 डिसेंबर रोजी, दुपारी बारा वाजता गोव्याहून चितोडगडकडे रवाना झाली होती.
यावेळी गाडीमध्ये राजेंद्रसिंह, राजू सिंग, गोपाल जिनगर, ताराचंद, चंदू माळी व अन्य असे एकूण नऊ प्रवासी होते. प्रवाशांव्यतिरिक्त गाडीमध्ये कॅटरिंगचे सर्व साहित्य मोठ्या प्रमाणावर भरण्यात आले होते. मलकापूर (जि.कोल्हापूर ) येथे बुधवारी रात्री 11.30 वाजता आल्यावर जेवण उरकून पुढच्या प्रवासासाठी, दुसऱ्या ड्रायव्हरकडे बस सोपविण्यात आली आणि सर्वजण झोपी गेले. रात्री 12.30 वाजता मेनी फाटा जवळील मेनी ओढ्यावरील पुलाचा कठडा व संरक्षक पाईप, चालकास न दिसल्याने, संरक्षक पाईप तोडून, गाडी 30 फूट खोल असणाऱ्या ओढ्याच्या पात्रात कोसळली, सुदैवाने या ओढ्यात पाणी कमी असल्याने जीवितहानी टळली.
अपघातग्रस्त गाडीतील शुद्धीवर आलेल्या एका प्रवाशाने, प्रसंगावधान राखून अपघातग्रस्त गाडीतून कशी तरी सुटका करून बाहेर येऊन मोबाईल वरून 100 नंबरवर फोन केला आणि लोकेशनवरून, घटनास्थळाचे ठिकाण शोधून मदतीसाठी पोलिसांना पाठविण्याची विनंती केली. त्यानंतर अवघ्या वीस मिनिटात पोलीस ठाण्याचे सपोनि ज्ञानदेव वाघ व अन्य पोलीस अंमलदार तसेच दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. पोलीस व रुग्णवाहिकेतून आलेल्या कर्मचाऱ्यांनी बसमध्ये अडकलेल्या उर्वरित प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. यामध्ये सात प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे रवाना करण्यात आले आहे. घटनेची नोंद कोकरूड पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सपोनी ज्ञानदेव वाघ करीत आहेत.