केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आश्वासन : गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून केवळ लक्ष घालण्याचे उत्तर
प्रतिनिधी /पणजी
म्हादई प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेलेल्या सत्ताधारी पक्षातील विविध नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, त्याचबरोबर पेंद्रीय जलस्रोतमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन गोव्यावरील अन्याय दूर करण्याची जोरदार मागणी केली. त्यांनी गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही, असे शिष्टमंडळाला सांगितले.
अमित शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. शेखावत यांनी काही काळजी करू नका. गोव्यावर अन्याय हेऊ देणार नाही, असे सांगितले. दोन्ही केंद्रीय नेत्यांच्या भेटीनंतर मध्यरात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गोव्यात परतले, उर्वरित नेते आज गुरुवारी गोव्यात परततील.
म्हादई जलविवाद चालू असताना अलिकडेच कर्नाटक सरकारने कळसा-भांडुरा धरण प्रकल्प उभारणीसाठी पाठविलेल्या आराखडय़ाला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिल्याने गोव्यात एकच खळबळ माजली होती. सरकारवर चारही बाजूने टीका झाली. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला, त्यामुळे बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृतवाखाली नवी दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळात केवळ सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला.
नवी दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळात केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, सुदिन ढवळीकर, नीलेश काब्राल, सुभाष शिरोडकर, सभापती रमेश तवडकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, डॉ. चंद्रकांत शेटय़े यांच्यासह राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर यांचा समावेश होता.
गोव्यावर अन्याय होऊ देणार नाही : शेखावत
या शिष्टमंडळाने अगोदर केंद्रीय जलस्रोतमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि ऍडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी म्हादई वळविली तर त्याचा गोव्यावर किती परिणम होईल, याविषयी सविस्तर माहिती दिली आणि कर्नाटकच्या धरण बांधकाम संदर्भात प्रस्तावित आराखडय़ाला दिलेली मान्यता त्वरित काढून घ्यावी. तसेच कर्नाटकला म्हादईचे पाणी वळविण्यावर प्रतिबंध लागू करावे, अशी जोरदार मागणी केली. शेखावत यांनी काळजी करू नका. आम्ही गोव्यावर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले.
अमित शहा यांच्याकडून अपेक्षाभंग
सायंकाळी या शिष्टमंडळाने अमित शहा यांची भेट घेऊन त्यांनाही लेखी निवेदन सादर केले व म्हादईची जोरदार बाजू गोव्यातर्फे मांडली. केंद्रीय गृहमंत्री काही बोलले नाहीत मात्र, या प्रकल्पात लक्ष घालतो, एवढेच आश्वासन दिल्याने नवी दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाचा अपेक्षाभंग झाला. अमित शहांसोबत शिष्टमंडळ 20 मिनिटे होते. त्यांनी सारी बाजू ऐकून घेतली. या भेटीनंतर रात्री उशिरा डॉ. प्रमोद सावंत हे गोव्याला येण्यास निघाले व पहाटे गोव्यात पोहोचले.









